ISL 2021: केरळाने रोखली ओडिशाची घोडदौड

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत उत्तरार्धातील दोन गोलमुळे पहिला विजय
ISL 2021: केरळाने रोखली ओडिशाची घोडदौड
ISL 2021: केरळाने रोखली ओडिशाची घोडदौडDainik Gomantak

पणजी: इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल (Football) स्पर्धेच्या आठव्या मोसमातील ओडिशा एफसीचे स्वप्नवत घोडदौड अखेर रविवारी केरळा ब्लास्टर्सने रोखली. उत्तरार्धातील दोन गोलच्या बळावर माजी उपविजेत्या संघाने सामना 2-1 फरकाने जिंकून यंदाच्या स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. सामना वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर झाला.

गोलशून्य पूर्वार्धानंतर 30 वर्षीय स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याने 62 व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सचे गोलखाते उघडले. आयएसएल स्पर्धेतील पन्नासावा सामना खेळणाऱ्या प्रशांत कारूथाडाथकुनी याने केलेल्या गोलमुळे 85 व्या मिनिटास केरळा ब्लास्टर्सपाशी दोन गोलची भक्कम आघाडी जमा झाली. बदली खेळाडू प्रशांतचा हा आयएसएलमधील पहिलाच गोल ठरला. 90+4 व्या मिनिटास बदली खेळाडू निखिल राज याने केरळाच्या भरकटलेल्या बचावफळीचा फायदा घेत केलेल्या गोलमुळे ओडिशा एफसीने पिछाडी 1-2 अशी कमी केली. या 20 वर्षीय आघाडीपटूने आयएसएल पदार्पण गोलसह साजरे केले.

ISL 2021: केरळाने रोखली ओडिशाची घोडदौड
रेल्वेचा महिला संघ गोव्यास भारी

पराभव आणि दोन बरोबरीनंतर केरळा ब्लास्टर्सने अखेर विजयाची चव चाखली. चार लढतीनंतर त्यांचे आता पाच गुण झाले आहेत. स्पर्धेत पहिले दोन सामने जिंकताना नऊ गोल केलेल्या ओडिशाला आज अपयश आले. स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे त्यांचे तीन लढतीनंतर सहा गुण कायम राहिले.

तासाभराच्या खेळानंतर अखेर गोलशून्य बरोबरीची कोंडी फुटली. स्पॅनिश आघाडीपटू अल्वारो वाझकेझ याने आयएसएल स्पर्धेतील पहिला गोल नोंदविताना केरळा ब्लास्टर्सला आघाडी मिळवून दिली. यावेळी त्याला ओडिशाच्या विस्कळित बचावाचा खूपच लाभ झाला. ॲड्रियन लुना याच्याकडून मिळालेल्या पासवर अल्वारो याने ओडिशाच्या बचावफळीस चकवा दिला. यावेळी गोलरक्षक कमलजित सिंग याने जागा सोडून पुढे येण्याची चूक केली, त्याचा फायदा अल्वारोने उठविला. पूर्ण मोकळ्या नेटमध्ये त्याने आरामात फटका मारला.

सामना संपण्यास पाच मिनिटे बाकी असताना लुना याने पुन्हा एकदा ओडिशाच्या बचाळफळीस बेसावध ठरवत प्रशांत सुरेख पास दिला. यावेळी केरळा ब्लास्टर्सच्या मध्यरक्षकास रोखण्यासाठी गोलरक्षक कमलजित पुढे आला आणि पुढील काम प्रशांत चोखपणे बचावले. बचावफळीतील त्रुटींमुळे ओडिशाला दोन्ही गोल स्वीकारावे लागले.

ISL 2021: केरळाने रोखली ओडिशाची घोडदौड
अमेय अवदीला बुद्धिबळात उपविजेतेपद

सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी आक्रमणे केली, पण त्यांना यश मिळाले नाही. 45 मिनिटांच्या खेळात तुलनेत केरळा ब्लास्टर्सचा वरचष्मा राहिला. सातव्याच मिनिटास त्यांच्या लुना याने शानदार फ्रीकिक फटक्यावर नेम साधण्याचा प्रयत्न केला, पण दक्ष गोलरक्षक कमलजितने धोका वेळीच ओळखला. ओडिशाच्या हेन्‍ड्री अंतोनेय याचा फटका केरळाचा गोलरक्षक आल्बिनो गोम्सने रोखल्यामुळे भुवनेश्वरच्या संघाचा आघाडी घेता आली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com