फुटबॉल पंचाचा निर्णय महासंघाने बदलला ; ईस्ट बंगालच्या डॅनी फॉक्सचे रेड कार्ड निलंबन रद्द

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 9 जानेवारी 2021

इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पंचगिरीबाबत सहभागी संघांचे प्रशिक्षक नाराजी व्यक्त करत असताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीवर आता पंचाचा (रेफरी) ऑनफिल्ड निर्णय बदलून खेळाडूचे रेड कार्ड निलंबन रद्द करण्याची पाळी आली.

पणजी : इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील पंचगिरीबाबत सहभागी संघांचे प्रशिक्षक नाराजी व्यक्त करत असताना अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) शिस्तपालन समितीवर आता पंचाचा (रेफरी) ऑनफिल्ड निर्णय बदलून खेळाडूचे रेड कार्ड निलंबन रद्द करण्याची पाळी आली. त्यामुळे स्पर्धेतील पंचगिरी प्रश्नांकित ठरली आहे.

आयएसएल फुटबॉल स्पर्धेत सहा जानेवारीस वास्को येथील टिळक मैदानावर झालेल्या ईस्ट बंगाल व एफसी गोवा यांच्यात सामना झाला होता. त्यात रेफरी ए. रोवन यांनी 56व्या मिनिटास डॅनी फॉक्स याला थेट रेड कार्ड दाखविले होते. त्यावेळी बचावपटू फॉक्स याने एफसी गोवाच्या अलेक्झांडर रोमारियो याला चेंडूवर ताबा राखण्याच्या प्रयत्नात टॅकल केले होते. तो सामना 1-1 असा गोलबरोबरीत राहिला होता. रेड कार्ड निलंबनामुळे ईस्ट बंगालचा कर्णधार बंगळूर एफसीविरुद्धच्या शनिवारच्या (ता. 9) सामन्यात अनुपब्ध ठरला होता, आता एआयएफएफ शिस्तपालन समितीने रेफरीचा मैदानावरील निर्णय बदलल्यामुळे फॉक्स बंगळूरविरुद्धच्या सामन्यासाठी निवडीस उपलब्ध झाला.

रेफरीच्या निर्णयाविरोधात ईस्ट बंगाल संघ व्यवस्थापनाने दाद मागितली होती. एआयएफएफ शिस्तपालन समितीने त्या घटनेचा व्हिडिओ अभ्यासला. त्यानंतर फॉक्स याने जाणीवपूर्वक गंभीर अडथळा किंवा हिंसक वर्तणूक केली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे रेफरींच्या निर्णयात बदल करण्यात आल्याचे आयएसएलतर्फे शनिवारी जाहीर करण्यात आले. रेफरीच्या बाजूने ही स्पष्ट चूक असून प्रामाणिक खेळाच्या हेतूने निर्णयात सुधारणा करण्यात आल्याचे शिस्तपालन समितीने म्हटले आहे. त्यामुळे फॉक्सचे सामन्यातील रेड कार्ड आणि एका सामन्याचे निलंबन रद्द ठरविण्यात आले.

संबंधित बातम्या