आदिल खान एफसी गोवा संघात

आदिल खान एफसी गोवा संघात
Copy of Gomantak Banner (37).jpg

पणजी : बचावफळी आणि मध्यफळी मजबूत करण्याच्या उद्देशाने गोमंतकीय बचावपटू आदिल खान याला एफसी गोवा संघाने करारबद्ध केले आहे. हैदराबाद एफसीकडून या 32 वर्षीय फुटबॉलपटूस ‘लोन’वर शुक्रवारी करारबद्ध केले.

आदिल भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू आहे. सेझा फुटबॉल अकादमीचा प्रशिक्षणार्थी असलेल्या आदिलने स्पोर्टिंग क्लब द गोवातर्फे 2008 मध्ये व्यावसायिक कारकिर्दीस सुरवात केली. नंतर तो काही काळ कोलकात्यातील मोहन बागानतर्फेही खेळला. इंडियन सुपर लीग फुटबॉल (आयएसएल) स्पर्धेच्या सुरवातीस दिल्ली डायनॅमोजचे प्रतिनिधित्व केल्यानंतर आदिल एफसी पुणे सिटी व नंतर हैदराबाद एफसीतर्फे आयएसएल स्पर्धेत खेळला. एकंदरीत आदिलने आयएसएल स्पर्धेत 61 सामन्यांत, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे 11 सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे.

‘‘मूळ गोमंतकीय असल्यामुळे एफसी गोवा क्लब माझ्या ह्रदयात आहे. अखेरीस या संघातर्फे खेळण्यासाठी योग्य परिस्थिती जुळून आली आहे. एफसी गोवाचे शर्ट परिधान करण्यासाठी मी आणखी प्रतीक्षा करू शकत नाही,’’ अशी भावनिक प्रतिक्रिया आदिलने दिली. आदिलपाशी चांगले नेतृत्वगुण आहेत. त्याच्या अनुभवाचा लाभ एफसी गोवास मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळेल, असा विश्वास क्लबचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी व्यक्त केला. गोलरक्षक धीरज सिंग याला करारबद्ध केल्यानंतर जानेवारीच्या दुसऱ्या टप्प्यात एफसी गोवाने करारबद्ध केलेला आदिल खान हा दुसरा फुटबॉलपटू आहे.

आयएसएल स्पर्धेत आदिल खान

- सामने : 61, गोल : 6

- एकूण मिनिटे : 4752,  एकूण पासेस : 1870

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com