लुईस सुवारेझलाही कोरोनाने गाठले; ब्राझील, बार्सिलोनाविरुद्धच्या सामन्यात राहणार अनुपस्थित

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 18 नोव्हेंबर 2020

ब्राझीलविरुद्धच्या विश्‍वकरंडक पात्रता सामन्याअगोदरच सुवारेझ कोरोनाग्रस्त झाल्याचा फटका उरुग्वेला बसू शकतो. संघातील तिघांना कोरोनाची बाधा झाली असली, तरी तिघांची प्रकृती उत्तम आहे.

लंडन- ॲथलेटिको माद्रिद आणि उरुग्वेचा हुकमी स्ट्रायकर लुईस सुवारेझला कोरोनाचा बाधा झाल्याचे त्याच्या राष्ट्रीय संघाने जाहीर केले आहे. सुवारेझसह राखीव गोलरक्षक रॉड्रिगो मुनोझ आणि आणखी एक सपोर्ट स्टाफमधील सदस्य कोरोनाबाधित झाल्याचे उरुग्वे फुटबॉल संघटनेकडून सांगण्यात आले. ब्राझीलविरुद्धच्या विश्‍वकरंडक पात्रता सामन्याअगोदरच सुवारेझ कोरोनाग्रस्त झाल्याचा फटका उरुग्वेला बसू शकतो. संघातील तिघांना कोरोनाची बाधा झाली असली, तरी तिघांची प्रकृती उत्तम आहे.

आरोग्याच्या नियमाप्रमाणे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत, असेही उरुग्वे फुटबॉल संघटनेकडून कळवण्यात आले. शुक्रवारी झालेल्या कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात उरुग्वेने ३-० असा विजय मिळवला. त्यात सुवारेझने पेनल्टीवर गोल केला होता. आता तो ब्राझीलविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाहीच; परंतु ला लीगा स्पर्धेत त्याच्या पूर्वाश्रमीच्या बार्सिलोनाविरुद्धच्या लढतीतही तो खेळण्याची शक्‍यता धुसर झाली आहे.

हा सामना २१ तारखेला होणार आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये स्टार खेळाडूंनाही आता कोरोनाची बाधा होत आहे. काही दिवसांपूर्वी लिव्हरपूलचा महम्मद सालाह त्याअगोदर ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही कोरोना पॉझिटिव्ह आला होता.
 

संबंधित बातम्या