फुटबॉलपटू मनवीर सिंगचा गोवा ते कोलकाता प्रवास!

किशोर पेटकर
गुरुवार, 27 ऑगस्ट 2020

एफसी गोवा संघातर्फे गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आश्वासक ठरलेला आघाडीपटू मनवीर सिंग याने तीन वर्षांसाठी कोलकात्यातील एटीके-मोहन बागान संघाशी करार केला आहे. त्यामुळे त्याची ‘घरवापसी’च झालीय. यापूर्वी तो तेथील क्लबकडून खेळला होता.

पणजी, एफसी गोवा संघातर्फे गतमोसमातील इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत आश्वासक ठरलेला आघाडीपटू मनवीर सिंग याने तीन वर्षांसाठी कोलकात्यातील एटीके-मोहन बागान संघाशी करार केला आहे. त्यामुळे त्याची ‘घरवापसी’च झालीय. यापूर्वी तो तेथील क्लबकडून खेळला होता.

मागील तीन मोसम एफसी गोवा संघात बदली खेळाडू ठरलेल्या २४ वर्षीय मनवीरला कोलकात्यातील संघाकडून आता जास्त संधी मिळण्याची आशा आहे. त्याचा नव्या संघाशी करार २०२३ पर्यंत आहे. गोव्यातील संघात तो स्पॅनिश स्ट्रायकर फेरान कोरोमिनास याच्या सावलीतच राहिला. गतमोसमात बेंचवरून मैदानात येत तो १९ सामन्यांत ६९९ मिनिटे खेळला व दोन गोलही नोंदविले. एफसी गोवाचे तत्कालीन स्पॅनिश प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांनी त्याला दुय्यम आघाडीपटूचाच दर्जा दिला. गतमोसमात त्याला खेळण्यासाठी जास्त मिनिटे मिळाली असली, तर कोरो हाच संघाचा आघाडीफळीतील हुकमी एक्का ठरला. नव्या मोसमापूर्वी एफसी गोवा संघास प्रमुख खेळाडूंनी सोडचिठ्ठी दिली आहे, त्यात आता मनवीरचीही भर पडली आहे.

मनवीर मूळचा पंजाबचा. तेथील मिनर्व्हा पंजाब एफसीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर २०१६ साली त्याने कोलकात्याच्या मोहम्मेडन स्पोर्टिंग क्लबशी करार केला. २०१६-१७ मोसमात तो द्वितीय विभागीय आय-लीग स्पर्धेत खेळला. २०१७ साली झालेल्या संतोष करंडक स्पर्धेत तो प्रकाशझोतात आला. स्पर्धा गोव्यात झाली होती. त्या स्पर्धेत मनवीरने पश्चिम बंगालचे प्रतिनिधित्व केले. अंतिम लढतीत यजमान गोव्याविरुद्ध अतिरिक्त वेळेतील फक्त एक मिनिट बाकी असताना मनवीरने केलेल्या गोलमुळे पश्चिम बंगालला विजेतेपद मिळविणे शक्य झाले. नंतर काही महिन्यांतच त्याला एफसी गोवा संघाने करारबद्ध केले. भारताच्या सीनियर संघातून मनवीर ९ सामने खेळला असून त्याने तीन आंतरराष्ट्रीय गोलही नोंदविले आहेत.

आगामी आयएसएल मोसमात आणि एएफसी कप स्पर्धेतही एटीके-मोहन बागानची ‘ग्रीन अँड मरून’ रंगाची जर्सी परिधान करण्यास आपण खूपच उत्साहित असल्याच्या आशयाचे मनोगत मनवीरने सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले आहे. एटीके-मोहन बागानचे स्पॅनिश प्रशिक्षक अंतोनियो हबास यांना या नव्या आघाडीपटूकडून आगामी मोसमात खूप अपेक्षा असतील. 

संबंधित बातम्या