फुटबॉलपटू नेस्टरची आश्वासक वाटचाल

फुटबॉलपटू नेस्टरची आश्वासक वाटचाल
Nestor Dias

पणजी युवा फुटबॉलपटू नेस्टर डायस याच्या कारकिर्दीची सुरवात धेंपो स्पोर्टस क्लबकडून झाली, त्याच्या गुणवत्तेने एफसी गोवा संघ व्यवस्थापनास प्रभावित केले. आता हा २१ वर्षीय खेळाडू त्यांच्या डेव्हलपमेंट संघाचा आधारस्तंभ ठरला आहे.

नेस्टरची फुटबॉल मैदानावरीलआतापर्यंत वाटचाल आश्वासक आहे. या मध्यरक्षकाने २०१९-२० मोसमात सातत्यपूर्ण खेळ केला. प्रो-लीग आणि द्वितीय विभाग आय-लीग स्पर्धेत त्याने एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघाची जबाबदारी पेलली.

``धेंपो स्पोर्टस क्लब आणि एफसी गोवा यांच्यात सामना होता. मला आठवतं, धेंपो क्लबकडून खेळताना मी बरोबरीचा गोल नोंदविला. त्यानंतर एफसी गोवा संघाकडून मला बोलावणे आले. त्यांनी माझ्यासाठी उत्सुकता दाखविली. त्यानंतर मी लगेच होकार दिला, खरं म्हणजे मी आश्चर्यचकीतच झालो होतो,`` असे धेंपो क्लब ते एफसी गोवा या प्रवासाविषयी नेस्टर म्हणाला.

क्लिफर्ड (मिरांडा) आणि डेरिक (परेरा) या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या खेळात सुधारणा झाल्याची कबुली नेस्टरने दिली. ``खडतर मेहनत घेण्यासाठी त्यांनी मला प्रेरणा दिली. त्यामुळे मी मध्यरक्षक या नात्याने प्रगती साधू शकलो. प्रशिक्षकांचा सल्ला माझ्या विकासात मौल्यवान ठरला आहे,`` असे नेस्टरने प्रशिक्षकांचे आभार मानताना सांगितले.

एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघाच्या मध्यफळीत नेस्टरने प्रिन्सटन रिबेलो, सेवियर गामा यांच्यासमवेत खिंड लढविली आहे. प्रिन्सटन व सेवियर यांनी आता एफसी गोवाच्या मुख्य संघात जागा मिळविली आहे. त्यांच्या पावलांवरून जाण्यासाठी नेस्टर इच्छुक आहे.

एफसी गोवाचा हुकमी मध्यरक्षक लेनी रॉड्रिग्जला नेस्टर आपला आदर्श मानतो. ``लेनीचा उपदेश नेहमीच माझ्यासमवेत असतो. त्याने मला सांगितलंय, की मी चांगला खेळाडू आहे आणि चेंडूवर ताबा मिळविताना अजिबात घाबरायचे नाही. माझ्यासाठी तो अनुकरण करण्यालायक खेळाडू आहे,`` असे नेस्टरने सांगितले.

चाहत्यांना भावनिक आवाहन

कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर नेस्टरने एफसी गोवाच्या पाठिराख्यांना भावनिक आवाहन केले आहे. महामारीवर मात करून लवकरच पुनरागम करण्याबाबत आशावाद व्यक्त केला आहे. नेस्टर म्हणाला, ``पाठिराखे आमच्या संघातील बाराव्या खेळाडूसम आहेत. ते मजबूत राहणे महत्त्वाचे आहे. साऱ्यांनी घरातच सुरक्षित राहावे आणि आम्ही खेळण्यास सुरवात केल्यावर तुमच्यासाठी परतफेड करू.``

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com