बुद्धी आणि शरीर धारदार राखण्यास फुटबॉलपटूंचे प्राधान्य

dainik gomantak
बुधवार, 13 मे 2020

घरीच अथवा घरच्या परिसरात तंदुरुस्तीविषयक उपक्रमांत लिअँडर आणि नेस्टर मग्न आहे. कुंकळ्ळी येथील लिअँडर २२ वर्षांचा, तर आजोशी येथील नेस्टर २१ वर्षांचा आहे.

पणजी,

कोरोना विषाणू महामारीच्या लॉकडाऊनमुळे देशातील फुटबॉल ठप्प आहे, मात्र या काळात क्रीडापटू तंदुरुस्तीविषयी जागरूक आहेत. एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघाचा कर्णधार लिअँडर डिकुन्हा आणि हुकमी मध्यरक्षक नेस्टर डायस यांनीही दर्जेदार तंदुरुस्तीद्वारे बुद्धी आणि शरीर धारदार राखण्यास प्राधान्य दिले आहे.

लॉकडाऊनमुळे मैदानावर प्रत्यक्ष स्पर्धात्मक चढाओढ अनुभवता येत नाही, त्याबद्दल क्रीडापटूंत निराशा असली, तरी त्यांनी फिटनेसचा ध्यास सोडलेला नाही. घरीच अथवा घरच्या परिसरात तंदुरुस्तीविषयक उपक्रमांत लिअँडर आणि नेस्टर मग्न आहे. कुंकळ्ळी येथील लिअँडर २२ वर्षांचा, तर आजोशी येथील नेस्टर २१ वर्षांचा आहे.

एफसी गोवाच्या डेव्हलपमेंट संघाच्या फिजिओने निश्चित केलेला कार्यक्रम, आहारतज्ज्ञांचा सल्ला याद्वारे खेळाडूला स्वतःचा सक्षम राखण्यास पुढाकार घेत आहेत. घरी शक्य असा खास व्यायाम फिटनेस प्रशिक्षकांनी खेळाडूंना दिला आहे. त्याचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याची माहिती लिअँडर व नेस्टर यांनी दिली.

``तंदुरुस्त राहण्यासाठी आम्ही सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत आणि आम्हाला सुचविण्यात आलेले व्यायाम नियमीत करत आहोत. आम्ही घरीच सहजपणे करू असे व्यायाम आणि कसरतींच्या प्रकारांचे नियोजन केले आहे, त्यामुळे लॉकडाऊनमध्ये तंदुरुस्ती राखणे शक्य झाले आहे,`` असे नेस्टरने सांगितले.

लिअँडरने सांगितले, की ``तंदुरुस्ती सराव सत्र पूर्ण करण्यास ४५ मिनिटे ते एक तासाचा अवधी लागतो. पुन्हा आम्हा मैदानात उतरू, तेव्हा आमचे शरीर योग्य आकारमानात असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर जबाबदारी घेत सराव कार्यक्रम पार पाडणे आवश्यक आहे.``

 

संबंधित बातम्या