ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स कालवश

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

डीन जोन्स हे ८०च्या दशकातील क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघातील एक महत्वपूर्ण खेळाडू होते. त्यांनी ५२ कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले असून ४६च्या सरासरीने ३६३१ धावा केल्या आहेत. यात ११ शतकांचा समावेश आहे. 

मुंबई: ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेट खेळाडू आणि समालोचक डीन जोन्स यांचे आज निधन झाले. 'आयपीयल' सामन्यांदरम्यान समालोचनासाठी मुंबईत दाखल झालेल्या जोन्सना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ५९ वर्षांचे होते.

डीन हे ८०च्या दशकातील क्रिकेट ऑस्ट्रेलिया संघातील एक महत्वपूर्ण खेळाडू होते. त्यांनी ५२ कसोटी सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले असून ४६च्या सरासरीने ३६३१ धावा केल्या आहेत. यात ११ शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय सामन्यांतही जोन्स यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली असून ७ शतकांच्या साहाय्याने ६०६३ धावा ठोकल्या आहेत. १९८६-८७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान खेळवल्या गेलेल्या मद्रास येथील कसोटी सामन्यातील त्यांची २१० धावांची खेळी आजही क्रिकेट विश्वात चर्चेचा विषय ठरते.  

क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावरही जोन्स हे सातत्याने क्रिकेटशी संबंधीत राहिले. त्यांनी अनेक संघांसाठी प्रशिक्षकाचीही भूमिका पार पाडली असून ते अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. 'पाकिस्तान सुपर लीग'मधील 'इस्लामाबाद युनायटेड' या संघाचे  मुख्य प्रशिक्षक असताना त्यांच्या संघाने विजेतेपदही पटकावले होते. 

त्यांच्या जाण्याने एक जाणकार खेळाडू, प्रशिक्षक आणि समालोचक निघून गेला असल्याची भावना क्रिकेट वर्तुळातून व्यक्त होत आहे.    

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या