विराट कोहलीला मिळालेल्या 'पॅटर्निटी लीव'नंतर सुनील गावस्कर यांनी केले मोठे वक्तव्य

गोमंतक ऑनलाईन टीम
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

विराट कोहली याला रजा मिळाल्यानंतर सुनील गावस्कर यांच्या 1975/76च्या एका किस्याची जोरदार चर्चा या निमित्ताने करण्यात येत आहे.

नवी दिल्ली- भारताचा कर्णधार आणि सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहली याला बीसीसीआयकडून पॅटर्निटी लीव देण्यात आली. तेव्हापासूनच यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. ऑस्ट्रेलियातील एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आता विराटच्या कर्णधारपदावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
 
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने आतापर्यंत दोन एकदिवसीय सामने खेळले असून या दोनही सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला. यानंतर होणाऱ्या टी20 मालिकेत आणि कसोटी मालिकेचा एक सामना खेळून कर्णधार विराट कोहली मायदेशी परतणार आहे. तो उर्वरीत तीन सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नसून पॅटर्निटी लीव घेऊन अनुष्काकडे येणार आहे. त्याच्या या लीव वर जोरदार चर्चा होत असून अनेक माजी क्रिकेटपटूंनी याबद्दल वक्तव्य केले आहे. भारताचा माजी कर्णधार कपिल देव याने म्हटले की, 'आता काळ बदलला आहे. आधी कोणताही खेळा़डू मालिका अर्ध्यावर सोडून येऊ शकत नव्हता.'    

 दरम्यान, विराट कोहली याला रजा मिळाल्यानंतर सुनील गावस्कर यांच्या 1975/76च्या एका किस्याची जोरदार चर्चा या निमित्ताने करण्यात येत आहे. भारतीय संघ त्यावेळी न्युझीलंड आणि वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर असताना सुनील गावस्कर यांचा मुलगा रोहन याचा जन्म झाला होता. बीसीसीआयने त्यावेळी गावस्कर यांना पॅटर्निटी लीव देण्यास नकार दिला होता. गावस्कर यांनी यावर मौन सोडले आहे.      

काय म्हणाले गावस्कर? 
गावस्कर यांनी 1975/76 दरम्यान खेळवण्यात आलेल्या न्युझीलंड आणि वेस्टइंडिज दौऱ्यावर बोलताना म्हटले आहे की, 'जेव्हा मी न्युझीलंड आणि वेस्टइंडिज दौऱ्य़ासाठी भारतीय संघाबरोबर रवाना झालो तेव्हा मला माहिती होते की, मी परतण्याआधीच माझ्या मुलाचा जन्म झालेला असेल. मात्र, मी भारतीय संघात खेळण्याप्रति कटिबद्ध होतो. ज्यात माझ्या पत्नीनेही मला सहकार्य केले. मी माझ्या मुलाच्या जन्माच्या वेळी पॅटर्निटी लीव मागितली नव्हती आणि मला बीसीसीआयकडून याबद्दल कोणतीही विचारणा करण्यात आली नव्हती.'   

 

संबंधित बातम्या