भारताच्या माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी २०२०-२१ मोसमात गोव्याकडून रणजी आणि सीनियर स्पर्धेत खेळण्यास इच्छुक

माजी ‘आंतरराष्ट्रीय’ गोव्याकडून खेळण्यास इच्छुक
माजी ‘आंतरराष्ट्रीय’ गोव्याकडून खेळण्यास इच्छुक

पणजी: भारताच्या माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी २०२०-२१ मोसमात गोव्याकडून रणजी आणि सीनियर स्पर्धेत खेळण्यास इच्छुक असल्याचे गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) कळविले आहे, मात्र त्यांना करारबद्ध करण्याबाबत संघटनेने अजून अंतिम निर्णय घेतलेला नाही.

कोरोना विषाणू महामारीमुळे आगामी देशांतर्गत क्रिकेट मोसम नक्की कधी सुरू होणार याची स्पष्टता नाही. प्राप्त माहितीनुसार, बीसीसीआय पाच गटात रणजी क्रिकेट स्पर्धा खेळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानुसार खेळाडू नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून काही क्रिकेटपटूंनी दुसऱ्या राज्याकडून पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने खेळण्यासाठी आपल्या मूळ संघटनेकडून ना हरकत दाखला (एनओसी) घेण्यास सुरवात केली आहे. काही खेळाडूंनी संघ बदलाच्या दृष्टीने रणजी स्पर्धेतील राज्य संघटनांना आपले अर्जही पाठविले आहेत. 

जीसीएकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ एकदिवसीय सामने खेळलेला बंगालचा वेगवान गोलंदाज अशोक डिंडा, पंधरा वर्षे कर्नाटकचे प्रतिनिधित्व करताना दोन वेळा रणजी करंडक जिंकलेला वेगवान गोलंदाज आर. विनयकुमार, हैदराबादचा अनुभवी फलंदाज बी. संदीप यांच्यासह गोव्याकडून खेळण्यासाठी बरेच अर्ज आले आहेत. 

प्रत्येक संघ मोसमात तीन पाहुणे क्रिकेटपटू करारबद्ध करू शकतो. सध्या गोव्याशी करारबद्ध असलेला कर्नाटकचा अमित वर्मा हा एकच पाहुणा क्रिकेटपटू आहे.
गुजरातचा यष्टिरक्षक स्मित पटेल याने गोव्याकडून आगामी मोसमात खेळणार नसल्याचे कळविले असून त्याला जीसीएने एनओसी पत्र दिलेले आहे. गतमोसमातील आणखी पाहुणा क्रिकेटपटू दिल्लीचा आदित्य कौशिक यंदापासून गोव्याचा स्थानिक खेळाडू या नात्याने खेळण्यासाठी कागदोपत्री दस्तऐवज बीसीसीआयला सादर करणार आहे.

जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी सांगितले, की ‘‘दरवर्षीप्रमाणे पाहुणा क्रिकेटपटू या नात्याने गोव्याकडून खेळण्यासाठी आमच्याकडे इतर राज्यातील खेळाडूंचे अर्ज आलेले आहेत. आम्ही अजून त्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही. सविस्तर चर्चेअंती खेळाडूची उपयुक्तता पाहूनच करार करण्यात येईल. सध्या आमच्याकडे फक्त इच्छुकांचे अर्ज आहेत.’’

भारताकडून एक कसोटी, ३१ एकदिवसीय आणि ९ टी-२० सामने खेळलेला ३६ वर्षीय विनयकुमार गतमोसमात (२०१९-२०) प्लेट गटातील पुदूचेरीकडून खेळला होता. त्याने भन्नाट मारा करताना ९ रणजी सामन्यांत ११.३१च्या सरासरीने ४५ गडी बाद केले होते. विनयकुमार दीर्घानुभी आहे. १३९ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यात त्याने ५०४ विकेट्स टिपल्या आहेत. बंगालचा अशोक डिंडाही ३६ वर्षांचा आहे, पण गतमोसमात तो फक्त एकच रणजी सामना खेळला. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक रणदेब बोस यांच्याशी वाद झाल्यानंतर डिंडा याला वगळण्यात आले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने ४२० गडी बाद केले आहेत. त्याला दुसऱ्या राज्याकडून खेळण्यासाठी बंगाल क्रिकेट संघटनेने एनओसी पत्र दिलेले आहे. हैदराबादचा २८ वर्षीय फलंदाज संदीप ५८ प्रथम श्रेणी सामने खेळला असून ७ शतकांच्या मदतीने त्याने ४४.३२च्या सरासरीने ३६३१ धावा केल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com