माजी ऑलिंपियन फुटबॉलपटू फ्रांको यांचे निधन

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 मे 2021

फॉर्च्युनात फ्रांको यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते कोविड बाधित (Corona) होते.

पणजी: भारताचे माजी ऑलिंपियन, आशियाई क्रीडा सुवर्णपदक विजेते गोमंतकीय फुटबॉलपटू 84 वर्षीय फॉर्च्युनात फ्रांको (Fortunato Franco) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते कोविड बाधित (Corona) होते.

रोम येथे 1960 साली झालेल्या ऑलिंम्पिक (Olympic) स्पर्धेत फॉर्च्युनात फ्रांको यांनी भारताचे फुटबॉलमध्ये प्रतिनिधित्व केले. 1962 साली भारताने जाकार्ता येथील आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेत फुटबॉलमध्ये दक्षिण कोरियास (South Korea) हरवून सुवर्णपदक जिंकले, त्यावेळी भारतीय संघाच्या मध्यफळीतील ते प्रमुख खेळाडू होते. 1966 साली बँकॉक(Bangkok) येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दुखापतीमुळे त्यांची खेळण्याची संधी हुकली. याशिवाय 1964 साली तेल अविव येथे झालेल्या आशिया कप, तसेच मलेशियातील मेर्डेका कप स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेल्या भारतीय भारतीय संघात त्यांचा समावेश होता. (Former Olympian footballer Franco dies)

AFC Champions League: एफसी गोवाच्या नवोदितांची छाप; प्रशिक्षक आनंदित

आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सात वर्षांच्या कालावधीत फ्रांको यांनी भारताचे पन्नासहून जास्त सामन्यांत प्रतिनिधित्व केले. संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्वही केले. 1963 साली संतोष करंडक विजेत्या महाराष्ट्राच्या संघातील ते प्रमुख खेळाडू होते. भारतीय फुटबॉल संघात ते पी. के. बॅनर्जी, चुनी गोस्वामी, तुळशीदास बलराम आदी दिग्गजांसमवेत खेळले होते.

मूळ गोमंतकीय, पण मुंबईतील फुटबॉल मैदानावर बहरलेले फॉर्च्युनात फ्रांको हे भारताचे माजी ऑलिंपियन आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते फुटबॉलपटू आहेत. बार्देश तालुक्यातील कोलवाळ येथे 1936 साली मे महिन्यात जन्मलेले फ्रांको गोवा मुक्तिपूर्व काळात कुटुंबीयांसमवेत मुंबईत (Mumbai) दाखल झाले. तेथील मैदानावर त्यांच्या नैसर्गिक फुटबॉल कौशल्यास धुमारे फुटले. सुरवातीस वेस्टर्न रेल्वेचे प्रतिनिधित्व केल्यानंतर फ्रांको टाटा फुटबॉल क्लबचे आधारस्तंभ बनले. 1966 साली सामना खेळताना झालेल्या गुडघ्याच्या गंभीर दुखापतीमुळे त्यांना स्पर्धात्मक फुटबॉलमधून निवृत्त व्हावे लागले. त्यानंतर ते टाटा उद्योगसमूहातून वरिष्ठ व्यवस्थापकपदी (जनसंपर्क) 40 वर्षांच्या सेवेनंतर 1999 साली निवृत्त झाले. त्यानंतर ते गोव्यात परतले आणि सासष्टी तालुक्यातील कोलवा येथे स्थायिक झाले.

AFC Champions League: एफसी गोवाच्या धीरजला एएफसीची शाबासकी

पत्नी मार्यटल, मुलगा जयदीप, मुलगी किरण असा फ्रांको यांच्या मागे परिवार आहे. त्यांच्या फुटबॉलमधील अलौकिक कारकिर्दीची दखल घेत काही वर्षांपूर्वी गोवा सरकारने त्यांना सन्मानित केले होते.

 

संबंधित बातम्या