माजी राज्य विजेते बुद्धिबळपटू ॲड. पुरुषोत्तम कंटक यांचे कर्करोगाने निधन

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

नैसर्गिक गुणवत्ता लाभलेले ॲड. कंटक कर्करोगी असूनही बुद्धिबळपटू या नात्याने सक्रिय होते. २०१३ साली त्यांना कर्करोगाचे निदान झाले, तरीही ते बुद्धिबळपटू या नात्याने राज्यस्तरीय स्पर्धांत उमेदीने भाग घेत होते.

पणजी: गोव्याचे माजी राज्य विजेते बुद्धिबळपटू ॲड. पुरुषोत्तम ऊर्फ श्याम कंटक यांची कर्करोगाविरुद्धची झुंज अयशस्वी ठरल्याने त्यांचे वयाच्या ५७व्या वर्षी निधन झाले. ज्युनियर, सीनियर आणि व्हेटरन गटात राज्यस्तरीय विजेतेपद मिळविलेले ते एकमेव गोमंतकीय बुद्धिबळपटू आहेत. गोव्यातील बुद्धिबळात ते ‘ॲड. पी. कंटक’ या नावाने परिचित होते.

ॲड. कंटक यांचे मंगळवारी निधन झाले, बुधवारी त्यांच्या पार्थिवावर अंतसंस्कार करण्यात आले. ते बोर्डा-मडगाव येथील रहिवासी होते, त्यांच्या मागे पत्नी गीता आहेत. ते महान साहित्यिक पद्मश्री बा. भ. बोरकर यांचे नातू होत. ब्रेन पॉवर गोवा चेस अकादमीचे ते संचालक होते. 

नैसर्गिक गुणवत्ता लाभलेले ॲड. कंटक कर्करोगी असूनही बुद्धिबळपटू या नात्याने सक्रिय होते. २०१३ साली त्यांना कर्करोगाचे निदान झाले, तरीही ते बुद्धिबळपटू या नात्याने राज्यस्तरीय स्पर्धांत उमेदीने भाग घेत होते. गतवर्षी झालेल्या अखिल गोवा राज्यस्तरीय फिडे मानांकन बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेत त्यांना चौथा क्रमांक मिळाला होता, त्यामुळे त्यांना राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळाली होती. २००१ साली ते सीनियर गटात राज्यस्तरीय विजेते ठरले होते.

‘‘ॲड. कंटक यांच्या निधनाची बातमी गोमंतकीय बुद्धिबळासाठी खूपच दुःखद आहे. संघटनेच्या स्पर्धांत ते हिरारीने भाग घेत असत. मी त्यांनी ऐंशीच्या दशकापासून ओळखत आहे. शेवटपर्यंत हार न मानणारे ते लढवय्ये बुद्धिबळपटू होते. त्यांच्यासाठी मी शांतीची प्रार्थना करत असून त्यांच्या पत्नीना या दुःखद प्रसंगी सामर्थ्य प्राप्त होवो अशी प्रभूचरणी प्रार्थना करत आहे. कंटक यांना त्यांच्या पत्नीचे शेवटपर्यंत सहकार्य लाभले, त्यांनी  पतीसमवेत बुद्धिबळात झोकून घेतले होते,’’ असे गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर यांनी दिवंगत माजी राज्य विजेत्यास श्रद्धांजली वाहताना सांगितले.  

राज्य पातळीवरील विविध स्पर्धांत यश प्राप्त केलेला युवा बुद्धिबळपटू नीरज सारिपल्ली याने ॲड. कंटक यांना श्रद्धांजली वाहताना सांगितले, की ‘‘त्यांच्याविरुद्ध खेळताना नेहमीच आव्हानात्मक आणि अवघड ठरायचे, त्याचा अनुभव कितीतरी युवा बुद्धिबळपटूंनी घेतला आहे. त्यांच्या धारदार आक्रमक खेळाचा सामना करणे शक्य न झाल्याने मी दोनेक वेळा त्यांच्याविरुद्ध पराभूत झालेलो आहे. त्यांच्याविरुद्ध खेळताना नेहमीच नवं शिकता यायचे. त्यांचे बुद्धिबळातील व्यक्तिमत्त्व सदाबहार आणि करमणूकप्रधान होते, आम्ही त्यांना कायमचे मुकलो आहोत.’’

गॅरी कास्पारोव होते आदर्श
‘‘महान बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव हे कंटक यांचे आदर्श होते, त्यांच्याप्रमाणेच ते धोका पत्करत, नाविन्यपूर्ण चाली रचत, वेळप्रसंगी त्याग करत, उत्कट भावनेने  बुद्धिबळ खेळत असत. ते बुद्धिबळासाठीच जन्मले होते आणि त्यांचे जीवन या खेळाप्रती समर्पित होते,’’ असे तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सदस्य संदीप हेबळे यांनी ॲड. कंटक यांच्याविषयी नमूद केले. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या