३६वी राष्ट्रीय स्पर्धेचे भवितव्य सध्या दोलायमान

क्रीडा प्रतिनिधी
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

गोव्यात नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. देशातील कोराना विषाणू महामारी परिस्थिती लक्षात घेता, स्पर्धा आणखी लांबण्याचे संकेत आहेत.

पणजी: गोव्यात नियोजित असलेली ३६वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा लांबणीवर टाकण्यावर केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. देशातील कोराना विषाणू महामारी परिस्थिती लक्षात घेता, स्पर्धा आणखी लांबण्याचे संकेत आहेत. कदाचित पुढील वर्षीच्या उत्तरार्धात टोकियो ऑलिंपिकनंतर स्पर्धा घेण्याचे ठरू शकते, पण सध्या ठोस काहीच नसल्याने स्पर्धेचे भवितव्य दोलायमान असल्याचे सूत्राने सांगितले.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्थानिक आयोजन समितीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेनंतरच गोव्यात ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा मुहूर्त निघू शकतो. स्पर्धेची नवी तारीख निश्चित करताना, भारतीय ऑलिंपिक संघटना आणि स्थानिक आयोजन समितीला देशातील कोरोना विषाणू महामारी प्रादुर्भावाच्या अनुषंगाने परिस्थितीचा आढावा घ्यावा लागेल, तसेच केंद्र सरकारचीही मान्यता मिळवावी लागेल. स्पर्धा घेण्यास परिस्थिती अनुकूल असेल, तरच गोव्यातील स्पर्धेचा नवा कालावधी ठरू शकेल.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची पुढील कालावधी ठरविताना, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हिरवा बावटा दाखविल्यानंतरच, स्पर्धेच्या नव्या तारखांची जुळवाजुळव केली जाईल. स्पर्धेच्या आयोजनाबाबत राज्य सरकार केंद्र सरकारचा सल्ला विचाराधीन घेईल, असे गोव्याचे क्रीडामंत्री मनोहर (बाबू) आजगावकर यांनी मे महिनाअखेरीस स्पर्धा लांबणीवर टाकण्याची घोषणा करताना स्पष्ट केले होते.

टोकियो ऑलिंपिक स्पर्धा पुढील वर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होईल. त्यामुळे ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी राष्ट्रीय स्पर्धेला मुहूर्त मिळण्याची संधी खूपच अंधूक आहे, असे गोवा ऑलिंपिक संघटनेच्या (जीओए) पदाधिकाऱ्याने सांगितले.

‘आयएसएल’मुळे मुख्य मैदाने अनुपलब्ध 
गोव्यात या वर्षी नोव्हेंबर ते पुढील वर्षी मार्च या कालावधीत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेचा सातवा मोसम प्रेक्षकांविना जैवसुरक्षा वातावरणात खेळला जाईल. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, बांबोळीतील जीएमसी ॲथलेटिक्स स्टेडियम व वास्को येथील टिळक मैदानावर बंद दरवाज्याआड सामने खेळले जातील. त्यानिमित्त आयएसएल स्पर्धेच्या आयोजकांनी तिन्ही मुख्य स्टेडियम आरक्षित केले असून स्पर्धा पूर्ण झाल्यानंतरच मैदानाचा ताबा राज्य प्रशासनाकडे येईल. त्यामुळे पुढील वर्षी मार्च अखेरपर्यंत तिन्ही मैदाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी स्थानिक आयोजन समितीला उपलब्ध होऊ शकणार नाहीत. साहजिकच कोरोना विषाणूची साथ आटोक्यात आली, तरी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पुढील वर्षी मार्चअखेरपर्यंत राज्य सरकारला हे तिन्ही क्रीडा प्रकल्प वापरता येणार नाहीत, याकडे सूत्राने लक्ष वेधले. नंतर पावसाळा, ऑलिंपिक स्पर्धा आदींचा विचार करता, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढील वर्षअखेरीस घेण्याबाबत चाचपणी होऊ शकेल, असे सूत्राला वाटते.

संबंधित बातम्या