निहालच्या अष्टपैलूत्वाची दखल !

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

गोवा क्रिकेट असोसिएशनने आगामी मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संभाव्य संघ निवडताना निहाल सुर्लकर याच्या गतमोसमातील अष्टपैलूत्वाची दखल घेतली आहे.

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनने आगामी मोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संभाव्य संघ निवडताना निहाल सुर्लकर याच्या गतमोसमातील अष्टपैलूत्वाची दखल घेतली आहे. या वेगवान गोलंदाजाने २०१९-२० मोसमात तळाच्या फळीत उपयुक्त फलंदाजीने छाप पाडली होती.

निहालने २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक एलिट क गट स्पर्धेत गतमोसमात शानदार खेळ केला. स्पर्धेतील तो सर्व आठही सामने खेळला. नव्या चेंडूच्या या गोलंदाजाने २८.०३च्या सरासरीने २९ गडी बाद केले, त्यात दोन वेळा डावात पाच गडी बाद करण्याची किमया साधली. फलंदाजीत १३ डावात त्याने ३३च्या सरासरीने तीन अर्धशतकांच्या मदतीने ३३० धावा केल्या. याशिवाय निहालने गतमोसमातील २३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धेत डेहराडून येथे हैदराबादविरुद्ध तळाच्या क्रमांकावर फलंदाजीस येत शतक (१०४) नोंदविले होते.

रणजी स्पर्धेच्या संभाव्य संघात स्थान मिळाल्यामुळे निहालचा आत्मविश्वास उंचावणार हे स्पष्ट आहे. गतमोसमात तो २३ वर्षांखालील संघाचा प्रमुख खेळाडू ठरला. विशेषतः तळात त्याच्या फलंदाजीतील गुणवत्तेमुळे मोठी नामुष्की टाळणे गोव्याला शक्य झाले. कन्नूर येथे केरळविरुद्धच्या पराभवात गोव्याचा पहिला डाव १४१ धावांत संपुष्टात आला. दुसऱ्या डावात गोव्याने निहालच्या नाबाद ९२ धावांच्या खेळीमुळे २७१ धावांची मजल गाठली. सांगे येथे गोव्याने झारखंडचा पहिला डाव ११७ धावांत गुंडाळला, त्यावेळी निहालने ४२ धावांत ६ गडी टिपले होते. गोव्याच्या फलंदाजांना अपयश आल्यामुळे गोव्याला तो सामना गमवावा लागला. त्या लढतीत निहालने दोन्ही डावात मिळून आठ गडी बाद केले होते.

संबंधित बातम्या