बार्देशात टर्फ खेळपट्टीसाठी जीसीएचे प्रयत्न

Dainik Gomantak
सोमवार, 15 जून 2020

गतमोसमातील शालेय क्रिकेट स्पर्धेत भाग घेतलेल्या संघांना खेळण्याचे साहित्य प्रदान

पणजी 

बार्देश तालुक्यात क्रिकेटसाठी टर्फ खेळपट्टी नसल्यामुळे मॅटिंगवर सामने खेळवावे लागतात, ही त्रुटी दूर करण्यासाठी तालुक्यात टर्फ खेळपट्टीसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) प्रयत्न असल्याची माहिती सचिव विपुल फडके यांनी दिली.

जीसीएच्या आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत २०१९-२० मोसमात बार्देश तालुक्यातील १३ शाळांना भाग घेतला, त्यांना नुकतेच क्रिकेट साहित्य प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम म्हापसा येथील श्री देव बोडगेश्वर मंदिर सभागृहात झाला. कोविड-१९ मुळे सामाजिक अंतर नियम पाळून झालेल्या सोहळ्यात संबंधित शाळांच्या शारीरिक शिक्षण शिक्षकांकडे क्रिकेट साहित्य सुपूर्त करण्यात आले. 

कार्यक्रमास म्हापशाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, जीसीएचे सचिव विपुल फडके, माजी अध्यक्ष विनोद (बाळू) फडके, सदस्य मोहन चोडणकर, तसेच स्पर्धा समन्वयक सुशांत नाईक, तुळशीदास शेट्ये, विकास पार्सेकर यांची उपस्थिती होती. 

बार्देश तालुक्यातील जीसीएचे सामने कोलवाळ येथील मैदानावर मॅटिंगवर खेळविले जातात. गतमोसमात तालुक्यातील शालेय, तसेच मुलींच्या गटातील सामने बोडगेश्वर मंदिराजवळील खुल्या जागेत खेळविण्यात आले होते. त्यासाठी जीसीएने खास मैदान विकसित केले होते. मैदान आणि खेळपट्टीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी नियोजन असून त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे विपुल यांनी सांगितले. मैदान विकासाच्या दृष्टीने शाळेशी सामंजस्य करार शक्य असल्याचेही विपुल यांनी नमूद केले. आसगाव-बार्देश येथील ज्ञानप्रसारक मंडळाचा (डीएम्स) शालेय मैदान विकसित करण्यासंदर्भात प्रस्ताव असल्याची माहिती विपुल यांनी दिली.

 दोन दिवसीय सामने कायम

जीसीएचे सचिव विपुल फडके यांनी सांगतिले, की ``गतमोसमात १४ वर्षांखालील शालेय सामने दोन दिवसीय होते. नव्या मोसमातही सामने दोन दिवसीय कालावधीचेच असतील. दोन दिवसीय सामन्यांमुळे युवा खेळाडूंची गुणवत्ता हुडकण्यास मदत झाली. युवा खेळाडूंनाही कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळाले. शालेय स्पर्धेतील कामगिरीद्वारे राज्याच्या संघात निवड होण्यापर्यंत खेळाडूंनी मजल मारली.``

संबंधित बातम्या