जीएफडीसी क्लब निर्मितीच्या विचारात

Dainik Gomantak
शनिवार, 20 जून 2020

जीएफडीसी नोंदणीकृत क्लब नसल्यामुळे मंडळास आपला संघ गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) विविध स्पर्धांत खेळविता येत नाही.

पणजी

प्रशिक्षणार्थींना स्पर्धात्मक फुटबॉलची संधी प्राप्त व्हावी या हेतूने गोवा फुटबॉल विकास मंडळ (जीएफडीसी) स्वतःचा क्लब निर्माण करण्याच्या विचारात आहे. यासंबंधी माहिती जीएफडीसीचे सदस्य सचिव आलेक्स दा कॉस्ता यांनी दिली.

राज्यातील ग्रासरूट फुटबॉलचा विकास साधण्याच्या उद्देशाने २०१२ साली माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंडळाची स्थापना केली होती. गोव्याचे पहिले अर्जुन पुरस्कारविजेते फुटबॉल गोलरक्षक ब्रह्मानंद शंखवाळकर यांची हल्लीच मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आलेक्स दा कॉस्ता यांनी शुक्रवारी सांगितले, की जीएफडीसी नोंदणीकृत क्लब नसल्यामुळे मंडळास आपला संघ गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) विविध स्पर्धांत खेळविता येत नाही. आम्ही लवकरच मंडळाची गोवा क्रीडा प्राधिकरणाकडे (एसएजी) क्लबच्या धर्तीवर नोंदणी करणार आहोत, त्यामुळे आम्हाला स्पर्धांत खेळता येईल.

जीएफडीसी संघाला जीएफए आपल्या स्पर्धांत नियमाचा आधार घेत खेळू देत नाही. त्यामुळे खेळाडूंना संधी मिळावी या हेतून राज्यातील व्यावसायिक क्लबशी संपर्क साधून प्रशिक्षणार्थींना संधी प्राप्त करून दिलेली आहे, असे दा कॉस्ता यांनी नमूद केले. जीएफडीसी प्रशिक्षणार्थी यापूर्वी चर्चिल ब्रदर्स संघातून राज्य पातळीवरील जीएफएच्या वयोगट स्पर्धांत खेळले आहे.

जीएफडीसीची मडगाव येथे निवासी अकादमी कार्यरत असून तेथे ३० खेळाडू प्रशिक्षण घेतात. २०१२ पासून जीएफडीसी दरवर्षी वेगवेगळ्या वयोगटात राज्यभरात असलेल्या ३८ केंद्रांद्वारे  अंदाजे साडेचार हजार फुटबॉलपटूंना प्रशिक्षण देत असल्याची माहिती दा कॉस्ता यांनी दिली.

संबंधित बातम्या