
37th National Sports Competition गोव्यातील ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी यजमान या नात्याने संघ शिबिरे आणि क्रीडा उपकरणे खरेदीसाठी राज्य सरकारने निधी पुरविण्याचा लांबलेला प्रश्न शुक्रवारी निकालात काढल्यानंतर आता सोमवारपासून (ता. ९) क्रीडा संघटना शिबिरे प्रक्रिया सुरू करणार आहेत.
मात्र जास्तीतजास्त पदके मिळावीत या हेतूने राज्य संघात ७० टक्के गोमंतकीय आणि ३० टक्के बाहेरगावचे खेळाडू खेळविण्यास अनुकूलता आहे.
गोव्याच्या संघात खेळाडू निवडीत ७०-३० टक्के धोरण असावे हे संयुक्त बैठकीत ठरलेले आहे आणि त्याची गोवा क्रीडा प्राधिकरण बैठकीच्या इतिवृत्तात नोंदही आहे.
त्यामुळे संघटना हे धोरण राबवू शकतात, असे गोवा ऑलिंपिक संघटनेचे सचिव गुरुदत्त भक्ता यांनी शनिवारी सांगितले.
अगोदर ठरल्यानुसार, सराव शिबिरे 45 दिवसांचे घेण्याचे ठरले होते, मात्र आता स्पर्धेच्या उद्घाटनास कमी दिवस शिल्लक असल्याने 30 दिवसांच्या कालावधीत शिबिर घ्यावे लागेल, असेही भक्ता यांनी नमूद केले.
लुसोफोनिया स्पर्धेत चांगला अनुभव
लुसोफोनिया क्रीडा स्पर्धा जानेवारी 2014 मध्ये गोव्यात झाली. तेव्हा भारत-गोवा संघाचे प्रतिनिधित्व करताना अधिकांश राष्ट्रीय आणि मोजके गोमंतकीय खेळाडू असे धोरण राबविण्यात आले होते.
ते यशस्वी ठरले. तेव्हा भारत-गोवा संघाने गुणतक्त्यात अव्वल स्थान मिळविताना ३७ सुवर्णांसह सर्वाधिक 92 पदके जिंकली होती. मात्र त्यापूर्वीच्या दोन लुसोफोनिया स्पर्धेत गोव्याने भारताचे प्रतिनिधित्व केले.
तेव्हा संघातील सारे खेळाडू गोमंतकीय होते, पण पदके खूप कमी मिळाली होती. २००६ साली मकावमध्ये एकही सुवर्ण मिळाले, तर २००९ साली लिस्बनमध्ये फक्त एकच सुवर्ण जिंकता आल होते.
गतवर्षी फक्त पाच ब्राँझपदके
गुजरातमध्ये गतवर्षी झालेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला एकही सुवर्णपदक जिंकता आले नव्हते, त्यांना पाच ब्राँझपदकांसह मोहीम आटोपती घ्यावी लागली होती.
त्यापूर्वी, २०१५ साली केरळमध्ये झालेल्या ३५व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याला एका सुवर्णासह ११ पदके मिळाली होती.
राष्ट्रीय स्पर्धेच्या मागील दोन दशकांच्या इतिहासात गोव्याने सर्वोत्तम कामगिरी २०११ मध्ये झारखंड येथील स्पर्धेत नोंदविली होती. तेव्हा गोव्याने पाच सुवर्णांसह एकूण १६ पदके प्राप्त केली होती.
काही खेळांत बाहेरगावचे खेळाडू आवश्यक
३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यजमान या नात्याने मैदानात उतरण्यापूर्वी संघ बांधणीसाठी काही क्रीडा संघटनांसाठी बाहेरगावचे खेळाडू अत्यावश्यक असतील, असे मत एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.
या पदाधिकाऱ्यानुसार, काही खेळ गोव्यासाठी एकदम नवे आहेत, त्यामुळे संघात बाहेरगावचे खेळाडू घ्यावेच लागतील, नपेक्षा गोव्याला फक्त सहभागापुरते खेळावे लागेल. फुटबॉलवगळता इतर खेळांत बाहेरगावचे खेळाडू गोव्यातर्फे खेळताना दिसू शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.