Goa: आव्हाने, अडथळ्यांवर मात करण्याचे ध्येय

गोव्याच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रशिक्षक राजेश कामत आशावादी
Goa: आव्हाने, अडथळ्यांवर मात करण्याचे ध्येय
गोवा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव सय्यद अब्दुल माजिद, प्रशिक्षण-क्रिकेट कार्यवाही प्रकाश मयेकर.Dainik Gomantak

पणजी: गोव्याचे युवा क्रिकेटपटू (Cricket) प्रदीर्घ कालावधीनंतर चार दिवसीय सामन्यांची स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मोहीम सोपी नसली, तरी आव्हाने आणि अडथळ्यांवर मात करण्याचे ध्येय संघाने बाळगले आहे, असे 19 वर्षांखालील क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राजेश कामत यांनी सांगितले. संघाच्या कामगिरीबाबत ते आशावादी आहेत.

कुचबिहार करंडक स्पर्धेत गोव्याचा एलिट क गटात समावेश आहे. चार दिवसीय सामन्यांच्या स्पर्धेतील मोहीम 29 नोव्हेंबरपासून सुरू होईल. त्यापूर्वी रविवारपासून स्पर्धा केंद्र असलेल्या गुजरातमधील सूरत येथे विलगीकरण प्रक्रिया सुरू होईल. कोरोना (Covid 19 )विषाणू महामारीमुळे ज्युनियर क्रिकेटपटूंसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ 2020-21 मोसमात एकही स्पर्धा घेऊ शकले नाही.

गोवा क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव सय्यद अब्दुल माजिद, प्रशिक्षण-क्रिकेट कार्यवाही प्रकाश मयेकर.
क्रिकेटपटू सौरभ बांदेकरचा ‘आप’मध्ये प्रवेश

सुमारे दीड वर्षांनंतर राष्ट्रीय पातळीवर ज्युनियर वयोगट स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये गोव्याचा 19 वर्षांखालील संघ विनू मांकड करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत खेळला. पाचपैकी एका लढतीत गोव्याने विजय नोंदविला, दोन लढतीत पराभव पत्करावा लागला, तर दोन लढतींचा पावसाचा फटका बसला.

तंदुरुस्तीसाठी खडतर काळ

गोव्यासाठी हे फार मोठे आव्हान आहे. आमचे खेळाडू अंदाजे दीड वर्षांत एकही सामना खेळले नाहीत. त्यांची तंदुरूस्ती पातळी खूपच खालावली आहे. जास्त आव्हानात्मक बाब खेळाडूंच्या अनुभवाबाबात आहे. काही खेळाडू 16 वर्षांखालील वयोमर्यादा ओलांडल्यानंतर दीर्घ कालावधीत स्पर्धा न खेळता थेट 19 वर्षांखालील संघात आले आहेत. या खेळाडूंसाठी कौशल्य आणि तंदुरुस्तीच्या पातळीवर हा बदल खूपच खडतर ठरू शकतो. संघर्षमय कालखंड असला, तरी खेळाडूंनी मेहनतीस प्राधान्य दिले ही कौतुकास्पद बाब आहे. गोवा क्रिकेट संघटनेकडूनही संघ बांधणीत भरीव सहकार्य लाभले,असे कर्नाटकच्या (Karnataka) माजी रणजीपटूने सांगितले. राजेश कामत गोव्याच्या रणजी संघाचे 2009-10 , 2010-11 मोसमात प्रशिक्षक होते. 2019-20 मोसमात ते 19 वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक बनले.

सामन्यांचा सराव आवश्यक

राजेश कामत यांनी वयोगट क्रिकेटपटूंसाठी अधिकाधिक स्पर्धात्मक सरावाची गरज प्रतिपादली. गोव्यातील वयोगट क्रिकेटपटूंना जास्तीत जास्त सराव सामने खेळायला मिळणे आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी कर्नाटकचे उदाहरण दिले. तेथे ८ ते ९ वर्षांचा युवा क्रिकेटपटू खूप सामने खेळतो, उलट गोव्यात क्रिकेटपटूचे स्पर्धात्मक क्रिकेट साधारणतः १४ वर्षी सुरू होते, याकडे कामत यांनी लक्ष वेधले. गोव्यात दरवर्षी जूनमध्ये पाऊस सुरू होतो आणि ऑक्टोबर अखेरपर्यंत पावसाळा असतो, त्यामुळे खेळाडूंच्या मैदानावरील तयारीवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे निरीक्षणही साठ वर्षीय प्रशिक्षकाने नोंदविले. गोवा क्रिकेट असोसिएशनचे अकादमी सुरू करण्याचे नियोजन आहे, त्यास कामत यांनी पाठिंबा दर्शविला, राज्यातील माजी क्रिकेटपटू प्रशिक्षणाकडे वळत आहे ही बाब आश्वासक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com