गोव्याने राजस्थानला सहा विकेट राखून नमविले; एकदिवसीय स्पर्धेत सलग दुसरा विजय

गोव्याने राजस्थानला सहा विकेट राखून नमविले; एकदिवसीय स्पर्धेत सलग दुसरा विजय
Goa Cricket

पणजी : गोव्याची अनुभवी फिरकी गोलंदाज सुनंदा येत्रेकर हिने पाच विकेट टिपत राजस्थानचा डाव 91 धावांत गुंडाळला, त्यानंतर गोव्याने चार विकेट गमावून सीनियर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट क गटात सलग दुसरा विजय नोंदविला. जयपूर येथील के. एल. सैनी स्टेडियमवर रविवारी झालेल्या लढतीत गोव्याने सहा विकेट राखून विजय मिळविला. अगोदरच्या लढतीत त्यांनी चंडीगडला 78 धावांनी हरविले होते. 

सुनंदाने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना 22 धावांत 5 विकेट टिपल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळालेल्या राजस्थानचा डाव 33व्या षटकात 91 धावांत आटोपला. त्यांनी नऊ विकेट अवघ्या 31 धावांत गमावल्या, त्यामुळे 1 बाद 60 वरून त्यांना धावांचे शतकही पार करता आले नाही. सुनंदाने कर्णधार एस. आर. जाट हिला पायचीत बाद केल्यानंतर राजस्थानची जबरदस्त घसरगुंडी उडाली. त्यातच तिघीजणी धावबाद झाल्याने त्यांचे आणखीनेच नुकसान झाले. राजस्थानची सलामीची खेळाडू पी. बी. शर्मा हिने अर्धशतक नोंदविताना 79 चेंडूंत सात चौकारांसह 50 धावा केल्या. 

उत्तरादाखल कर्णधार शिखा पांडे (नाबाद 35) व सुनंदा येत्रेकर (27) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी करत गोव्याचा सोपा विजय साध्य केला. तिसाव्या षटकातील पाचव्या चेंडूवर चौकार लगावत शिखाने गोव्याच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान : 32.2 षटकांत सर्व बाद 91 (पी. बी. शर्मा 50, ए. डी. गर्ग 10, एस. आर. जाट 14, शिखा पांडे 5-0-13-0, निकिता मळीक 2-0-10-0, सोनाली गवंडर 6-1-17-0, सुनंदा येत्रेकर 10-2-22-5, रूपाली चव्हाण 5-0-16-1, दीक्षा गावडे 3-1-9-0, तेजस्विनी दुर्गड 1.2-1-3-1) पराभूत वि. गोवा : 29.5 षटकांत 4 बाद 95 (विनवी गुरव 7, पूर्वजा वेर्लेकर 5, सुनंदा येत्रेकर 27, शिखा पांडे नाबाद 35, संजुला नाईक 0, तेजस्विनी दुर्गड नाबाद 7, आर. मीना 2-21).
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com