विजय हजारे करंडक : गोव्याने साकारला पहिला विजय

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 26 फेब्रुवारी 2021

डावात पाच गडी बाद केलेल्या लक्षय गर्गची प्रभावी गोलंदाजी, तसेच शतक आठ धावांनी हुकलेल्या एकनाथ केरकर याने नाबाद अर्धशतकवीर दर्शन मिसाळ याच्यासमवेत केलेली महत्त्वपूर्ण भागीदारी या बळावर गोव्याने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटात शुक्रवारी पहिल्या विजयाची नोंद केली.

पणजी : डावात पाच गडी बाद केलेल्या लक्षय गर्गची प्रभावी गोलंदाजी, तसेच शतक आठ धावांनी हुकलेल्या एकनाथ केरकर याने नाबाद अर्धशतकवीर दर्शन मिसाळ याच्यासमवेत केलेली महत्त्वपूर्ण भागीदारी या बळावर गोव्याने विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटात शुक्रवारी पहिल्या विजयाची नोंद केली. अगोदरचे सलग तीन सामने गमावल्यानंतर त्यांनी त्रिपुरास तीन विकेट राखून नमविले.

गुजरातमधील सूरत येथील लालभाई काँट्रेक्टर स्टेडियमवर झालेल्या या लढतीत गोव्याने 217 धावांचे लक्ष्य सात विकेट गमावून आणि 27 चेंडू राखून पार केले. संघ 5 बाद 110 असा अडचणीत असताना एकनाथ व दर्शन समजुतदारपणे खेळले. त्यांनी सहाव्या विकेटसाठी 98 धावांची भागीदारी करून गोव्याचा विजय निश्चित केले. मुंबईतर्फे रणजी क्रिकेट खेळलेल्या एकनाथने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना 126 चेंडूंत सात चौकार व एका षटकाराच्या मदतीने 92 धावा केल्या. विजयासाठी नऊ धावा हव्या असताना तो मणिशंकर मुरासिंग याच्या गोलंदाजीवर उदियन बोस याच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर लगेच दीपराज गावकर धावबाद झाला, मात्र स्पर्धेत सुरेख फलंदाजी केलेल्या दर्शनने गोव्याच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. अगोदरच्या लढतीत छत्तीसगडविरुद्ध 56 धावा केलेला केलेला दर्शन 54 धावांवर नाबाद राहिला. त्याने 59 चेंडूंतील खेळीत तीन चौकार व दोन षटकार मारले. त्रिपुराचा हा सलग चौथा पराभव ठरला.

INDVsENG : इंग्लंड दोनच दिवसात हरल्यामुळे केविन पीटरसन भडकला; म्हणाला..

गोव्याने सकाळी नाणेफेक जिंकून त्रिपुरास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीमुळे त्यांनी त्रिपुराचा डाव 216 धावांत गुंडाळला. वेगवान गोलंदाज 25 वर्षीय लक्षय गर्ग याने लिस्ट ए क्रिकेट कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना 42 धावांत 5 गडी बाद केले. त्रिपुराच्या डावात प्रत्युष सिंग व अर्धशतकवीर मिलिंद कुमार (68) यांनी चौथ्या विकेटसाठी 50 धावांची भागीदारी केली. स्नेहल कवठणकरच्या फेकीवर प्रत्युष धावबाद झाल्यानंतर त्रिपुराचा फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. 33 व्या षटकात डावखुरा फिरकीपटू अमूल्य पांड्रेकर याने सलग दोन चेंडूवर गडी बाद केल्यामुळे त्रिपुराचा डाव 6 बाद 118 असा गडगडला. अर्जुन देबनाथ व परवेझ सुलतान यांनी थोडाफार प्रतिकार करताना नवव्या विकेटसाठी 41 धावांची भागीदारी केल्यामुळे त्रिपुरास दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

उत्तरादाखल गोव्याची सुरवात खराब ठरली. मात्र सलामीवीर एकनाथ केरकर आणि स्नेहल कवठणकर यांनी दुसऱ्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याला सावरता आले. स्नेहलला अर्जुन देबनाथने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेलबाद केल्यानंतर गोव्याने 25 धावांत आणखी तीन विकेट गमावल्या, त्यामुळे डाव 5 बाद 110 असा गडगडला. अनुभवी कीनन वाझ पहिल्याच चेंडूवर बाद झाला. त्यामुळे प्रत्युष सिंगला हॅटट्रिकची संधी प्राप्त झाली होती. स्पर्धेत सुरेख फॉर्म प्रदर्शित केलेल्या दर्शन मिसाळने एकनाथला समर्थ साथ दिली. त्यांनी सहाव्या विकेटसाठी दमदार भागीदारी केल्यामुळे गोव्याला स्पर्धेतील सलग तीन पराभवानंतर पहिला विजय नोंदविता आला.

 

संक्षिप्त धावफलक

त्रिपुरा : 50 षटकांत सर्व बाद 216 (बिक्रमकुमार दास 10, उदियन बोस 21, प्रत्युष सिंग 20, मिलिंद कुमार 68- 89 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार, रजत डे 27, अर्जुन देबनाथ 25, परवेझ सुलतान 16, लक्षय गर्ग 8-1-42-5, विजेश प्रभुदेसाई 5-0-27-0, दीपराज गावकर 9-1-23-0, दर्शन मिसाळ 8-1-28-0, सुयश प्रभुदेसाई 1-0-8-0, अमित वर्मा 10-0-51-2, अमूल्य पांड्रेकर 9-1-33-2) पराभूत वि. गोवा ः 45.3 षटकांत 7 बाद 217 (एकनाथ केरकर 92, वैभव गोवेकर 1, स्नेहल कवठणकर 35, अमित वर्मा 3, सुयश प्रभुदेसाई 8, कीनन वाझ 0, दर्शन मिसाळ नाबाद 54, दीपराज गावकर 0, लक्षय गर्ग नाबाद 0, मणिशंकर मुरासिंग 2-36, अर्जुन देबनाथ 1-45, प्रत्युष सिंग 2-55, परवेझ सुलतान 1-44).

 

दृष्टिक्षेपात गोव्याच्या खेळाडूंची कामगिरी...

- 5-45 ः लक्षय गर्गची 26 लिस्ट ए सामन्यांतील वैयक्तिक सर्वोत्कृष्ट गोलंदाजी

- 92 ः 27 वर्षीय एकनाथ केरकर याची 4 लिस्ट ए सामन्यातील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या

- नाबाद 54 ः दर्शन मिसाळची सलग 2, तर एकंदरीत लिस्ट ए क्रिकेटमध्ये 45 सामन्यांत 5 अर्धशतके

- 174 ः दर्शन मिसाळच्या स्पर्धेतील 4 डावातील धावा

संबंधित बातम्या