ऑनलाईन बुद्धिबळात गोमंतकीयांची छाप

क्रीडा प्रतिनिधी
रविवार, 13 सप्टेंबर 2020

गोवा बुद्धिबळ संघटनेच्या श्री मनोहर पर्रीकर गोवा ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या क गट (१६०० खालील एलो मानांकन) स्पर्धेत गोमंतकीय बुद्धिबळपटूंनी छाप पाडली. राज्यातील बुद्धिबळपटूंत एथन वाझ याची कामगिरी उत्कृष्ट ठरली.

पणजी:  गोवा बुद्धिबळ संघटनेच्या श्री मनोहर पर्रीकर गोवा ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या क गट (१६०० खालील एलो मानांकन) स्पर्धेत गोमंतकीय बुद्धिबळपटूंनी छाप पाडली. राज्यातील बुद्धिबळपटूंत एथन वाझ याची कामगिरी उत्कृष्ट ठरली.

कोरोना विषाणू महामारीमुळे मुख्य स्पर्धा रद्द झाल्यामुळे ब्लिट्झ पद्धतीने आता ही स्पर्धा ऑनलाईन खेळविण्यात येत आहे. क गटात भारतासह कॅनडा, दक्षिण आफ्रिका, अमेरिका आदी देशातील स्पर्धक सहभागी झाले होते. ऑनलाईन स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष वीजमंत्री नीलेश काब्राल, सचिव किशोर बांदेकर यांनी आनंद व्यक्त केला. ब गट (२००० एलो खालील) ऑनलाईन ब्लिट्झ स्पर्धा रविवारी (ता. १३) दुपारी साडेतीन वाजल्यापासून खेळली जाईल.

स्पर्धेत तमिळनाडूचा एम. एस. नवीन (एलो १५३८) याने १३ फेऱ्यांतून १०.५ गुणांची कमाई केली. त्याला प्रथम क्रमांक मिळाला. अन्य दोघा खेळाडूंचेही प्रत्येकी १०.५ गुण झाले, मात्र टायब्रेकर गुणांत एरन मेंडिस याला दुसरा, तर अरेना कँडिडेट मास्टर अरविंद अय्यर याला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

गोमंतकीय बुद्धिबळपटूंत एथन वाझ याला सहावा, नेत्रा सावईकर हिला बारावा, स्नेहिल शेट्टीस पंधरावा, आयुष शिरोडकरला सोळावा, तर जॉय काकोडकरला अठरावा क्रमांक मिळाला. गोव्याच्या अन्य खेळाडूंत वेगवेगळ्या गटात तेजस शेट वेर्णेकर, अंकित शेट्टी, तनिष्क कवळेकर, सईजा देसाई, व्हिवान बाळ्ळीकर, लव्ह काकोडकर, साईराज वेर्णेकर, आकाश शेटगावकर, वेद नार्वेकर, रक्षीत शेट्टी, एड्रिक वाझ, श्रीलक्ष्मी कामत, सयुरी नाईक, श्वेता सहकारी, सय्यद मैझा, सानी गावस आदी बक्षीसप्राप्त ठरले.

हेराफेरीमुळे सात जण अपात्र
ऑनलाईन स्पर्धेत खेळताना सात स्पर्धकांनी हेराफेरी केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे स्पर्धेच्या फसवणूक विरोधी समितीने त्यांना स्पर्धेतून अपात्र केले. आनंद बाबू यांनी स्पर्धेत मुख्य आर्बिटरची जबाबदारी पार पाडली. त्यांना तांत्रिक समितीतील इतर सदस्यांचे सहकार्य लाभले. गोवा बुद्धिबळ संघटनेच्या स्पर्धा आयोजन समिती सदस्यांचीही मदत लाभली.

संबंधित बातम्या