Goa Chess : मायदेशी परतण्याचा आनंद अवर्णनीय : लिऑन

Goa Chess : युवा ग्रँडमास्टरची भावना; कोविड अनिश्चिततेमुळे धोकेही
Goa Chess : मायदेशी परतण्याचा आनंद अवर्णनीय : लिऑन
Goa Chess : Leon MendoncaDainik Gomantak

पणजी : दीर्घ कालावधीनंतर मायदेशी परतण्याची भावना अवर्णनीय आहे, मायभूमीवर पाऊल ठेवताच खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया युरोपात वडिलांसमवेत तब्बल दीड वर्षे व्यतित केल्यानंतर गोव्यात परतलेला बुद्धिबळ (Goa Chess) ग्रँडमास्टर लिऑन मेंडोंसा (Leon Mendonca) याने गुरुवारी दिली. गोव्यात दाखल झाल्यानंतर 15 वर्षीय लिऑन म्हणाला, घरी परतल्यामुळे मी खूप आनंदित आहे. ग्रँडमास्टर किताबाची स्वप्नपूर्ती झाली, पण परदेशात सतत राहावे लागल्यामुळे अडचणींचा सामनाही करावा लागला. महामारीमुळे सारे काही अनिश्चित असल्याने धोकेही होते. आता निश्चिंत वाटते. तो देशातील 67वा, तर गोव्यातील दुसरा आणि सर्वांत युवा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आहे.

हंगेरीत अडकला

युरोपात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 18 मार्च 2020 रोजी लिंडन यांनी लिऑन याच्यासह दोहामार्गे दिल्ली जाणारे विमान पकडण्यासाठी बुडापेस्ट विमानतळावर धाव घेतली, परंतु तोपर्यंत भारतात जाण्याचा हवाई मार्ग बंद झाला होता. त्यांनी वंदे भारत मोहिमेअंतर्गत भारतात परतण्यासाठी बुडापेस्टमधील भारतीय दूतावासात अर्ज केला, पण हंगेरीची राजधानीत या मोहिमेच्या यादीत नसल्याने मेंडोंसा पिता-पुत्रात मायदेशी परतण्याचे प्रयत्न हुकले.

विविध देश, 16 स्पर्धा...

गेल्या वर्षी कोविड-19 निर्बंधांमुळे लिऑन आणि त्याचे वडील लिंडन यांना तब्बल दोन महिने बुडापेस्टमध्ये राहावे लागले. त्यानंतर युरोपातील लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर लिऑनने बुद्धिबळ स्पर्धांत खेळण्यास सुरवात केली. मार्च ते डिसेंबर 2020 अखेरपर्यंत विविध देशांत 16 स्पर्धा खेळत लिऑनने ग्रँडमास्टर किताबासाठी पात्रता मिळविली. या कालावधीत त्याला हंगेरी, सर्बिया, ग्रीस, इटली, स्लोव्हाकिया, जर्मनी, चेक प्रजासत्ताक, स्पेन या देशांत स्पर्धा खेळण्यासाठी प्रवास करावा लागला. त्या दरम्यान, मेंडोंसा पिता-पुत्रास कितीतरी कोविड-19 चाचण्या द्याव्या लागल्या, आंतरराष्ट्रीय प्रवासाची दगदग सहन करावी लागली. आरोग्य सुरक्षेवर ध्यान देतानाच आर्थिक कसरतही करावी लागली.

Goa Chess : Leon Mendonca
गोव्याचा लिऑन चौदाव्या वर्षी ग्रँडमास्टर

वडील बनले व्यवस्थापक

ग्रँडमास्टर ध्येयाने पछाडलेला लिऑन युरोपात बुद्धिबळ खेळत असताना वडील लिंडन यांनी व्यवस्थापनाची भूमिका चोख बजावली. दोघांसाठी जेवण बनविणे, स्पर्धास्थळी प्रवासाचे नियोजन, भाडोत्री निवासाची व्यवस्था आदी बाबींकडे लिंडन यांनी लक्ष पुरविले.

दुसरा गोमंतकीय ग्रँडमास्टर

अनुराग म्हामल याच्यानंतर लिऑन गोव्याचा दुसरा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आहे. 14 वर्षे, 9 महिने आणि 17 दिवसांचा असताना त्याने ग्रँडमास्टर किताबासाठी पात्रता मिळविली. 2021 मधील जागतिक बुद्धिबळ महासंघाच्या (फिडे) पहिल्या बैठकीत त्याच्या ग्रँडमास्टर किताबावर शिक्कामोर्तब झाले.

तीन महिन्यांत स्वप्नपूर्ती

लिऑनने 2020 मध्ये ग्रँडमास्टर किताबाचे तिन्ही नॉर्म प्राप्त केले. ऑक्टोबर 2020 मध्ये हंगेरीतील रिगो चेस राऊंड रॉबिन स्पर्धेत पहिला, तर नोव्हेंबरमध्ये बुडापेस्ट येथील फर्स्ट सॅटरडे स्पर्धेत दुसरा नॉर्म प्राप्त केला. इटलीतील व्हर्गानी स्पर्धेत डिसेंबर 2020 मधील अखेरच्या आठवड्यात खेळत त्याने ग्रँडमास्टर किताबाचा तिसरा नॉर्म मिळविला. सध्या त्याचे 2537 एलो गुण असून गोमंतकीयांत सर्वाधिक आहेत.

युवा आयएम बुद्धिबळपटू

लिऑन 2019 साली गोव्याचा सर्वांत युवा इंटरनॅशनल मास्टर (आयएम) खेळाडू बनला होता. 12 वर्षे 11 महिने आणि 3 दिवसांचा असताना लिऑनने तिसरा नॉर्म आणि 2400 एलो गुणांसह आयएम किताबाची पूर्तता केली होती.

Goa Chess : Leon Mendonca
Goa: बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर लिऑनचे गोव्यात आगमन

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com