आंगुलोकडून गोलसातत्य अपेक्षित

किशोर पेटकर
शुक्रवार, 24 जुलै 2020

मागील तीन मोसमातील यशस्वी कोरो याची जागा घेण्याची संधी

पणजी

पोलंडमधील व्यावसायिक फुटबॉलमध्ये गोलसातत्य राखलेल्या स्पेनच्या इगोर आंगुलो याला करारबद्ध करून एफसी गोवा संघाने तोच आक्रमणातील हुकमी योद्धा असण्याचे संकेत दिले आहेतत्याचवेळी आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेत्या संघाने फेरान कोरोमिनास (कोरो) या स्पॅनिश आघाडीपटूचा करार वाढविलेला नाही.

मागील तीन मोसमात एफसी गोवासाठी सर्वाधिक गोल केलेल्या कोरो याच्याप्रमाणेच आंगुलोही सेंटर-फॉरवर्ड जागी खेळतो. ३७ वर्षीय कोरोपेक्षा आंगुलो एका वर्षाने लहान आहे. नव्या आयएसएल मोसमाततसेच एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेसाठी एफसी गोवाने स्पेनचेच ह्वआन फेरॅन्डो या नव्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली आहे. एफसी गोवाच्या शैलीत गोलधडाका राखण्यासाठी नव्या प्रशिक्षकांना नवे पाय हवेत हे आंगुलोच्या करारने स्पष्ट झाले आहे. माजी प्रशिक्षक सर्जिओ लोबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली कोरो याचा खेळ धारदार ठरला होता. त्याने पहिल्या दोन मोसमात अनुक्रमे १८ व १६तर गतमोसमात १४ गोल नोंदविले होते.

पोलंडमधील गॉर्निक झाब्रझ संघाचे प्रतिनिधित्व करताना २०१६ पासून चार मोसमात आंगुलो याने छाप पाडली आहे. त्याने सर्व स्पर्धांतील मिळून १५४ सामन्यांत ८८ गोल केले आहेततसेच २१ असिस्टची नोंद केली आहे. २०१८-१९ मोसमात तो एक्स्ट्राक्लासा स्पर्धेत गोल्डन बूटचा मानकरी ठरला होता. पोलंडमधील शेवटच्या मोसमात आंगुलोने ३२ सामन्यांत १७ गोलची नोंद केली.

कोरो याच्याशी एफसी गोवाने जुलै २०१७ मध्ये करार केला होता. आयएसएल स्पर्धेच्या दोन मोसमात (२०१७-१८ व २०१८-१९) सर्वाधिक गोल नोंदवत या सेंटर-फॉरवर्ड खेळाडूने गोल्डन बूटचा मानही मिळविला. एफसी गोवाकडून सलग तीन आयएसएल मोसम खेळताना कोरो याने ५७ सामन्यांतून ४८ गोल नोंदविलेतर १६ असिस्ट आहेत. दोन सुपर कप स्पर्धेत ७ गोल केले आहेत. मेअखेरीस करार संपुष्टात आल्यानंतर सध्या कोरो करारमुक्त खेळाडू आहे.

संपादन- अवित बगळे

 

संबंधित बातम्या