धारबांदोड्यात घडणार गुणवान क्रिकेटपटू..!

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

दर्जेदार क्रिकेट सुविधांच्या निर्मितीसाठी धारबांदोडा पंचायतीशी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) नऊ वर्षांचा सामंजस्य करार केला असून त्यानुसार तेथे दोन टर्फ खेळपट्ट्या असलेले क्रिकेट मैदान साकारणार आहे

पणजी  : दर्जेदार क्रिकेट सुविधांच्या निर्मितीसाठी धारबांदोडा पंचायतीशी गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) नऊ वर्षांचा सामंजस्य करार केला असून त्यानुसार तेथे दोन टर्फ खेळपट्ट्या असलेले क्रिकेट मैदान साकारणार आहे, शिवाय युवा क्रिकेटपटूंच्या सरावासाठी दोन सिमेंट खेळपट्ट्यांचीही सोय केली जाईल.

धारबांदोडा पंचायत आणि जीसीए यांच्यातील मैदानविषयक सांमजस्य करारावर बुधवारी पर्वरी येथील जीसीए कार्यालयात स्वाक्षरी झाली. यावेळी धारबांदोड्याच्या सरपंच स्वाती गावस, जीसीएचे सचिव विपुल फडके, खजिनदार परेश फडते, हरीश शिंदे, सुदेश नार्वेकर, धारबांदोड्याचे पंचसदस्य दत्तराज गावस, यशवंत बांदोडकर आदींची उपस्थिती होती. 

धारबांदोडा पंचायत क्रिकेट मैदान कार्यरत झाल्यानंतर, स्थानिकांसह फोंडा आणि सावर्डे परिसरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंना दर्जेदार क्रिकेट सुविधा उपलब्ध होतील, तसेच सरावाची संधीही मिळेल. याविषयी विपुल फडके यांनी सांगितले, की या सामंजस्य करारांतर्गत मुख्य मैदानावर दोन टर्फ खेळपट्ट्या असतील, तसेच सरावासाठी दोन सिमेंट खेळपट्ट्याही तयार करण्यात येतील. मैदानाची निगराणी, व्यवस्था जीसीए पाहील, शिवाय कुशल प्रशिक्षकाचीही सोय केली जाईल. गोव्यात ग्रामपातळीवर क्रिकेट विकसित करण्यासाठी जीसीए कटीबद्ध आहे आणि धारबांदोडा पंचायतीशी करार त्यादृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. करारांतर्गत कालावधीत धारबांदोडा पंचायत मैदान परिपूर्ण स्थितीत राखले जाईल.

करारांतर्गत मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल जीसीएचे अध्यक्ष सूरज लोटलीकर यांनी धारबांदोडा पंचायतीचे आभार मानले. करारामुळे ग्रामीण पातळीवर पायाभूत क्रिकेटचा विकास साधला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. क्रिकेट प्रशिक्षणासाठी धारबांदोडा व जवळपासच्या परिसरातील युवा होतकरू क्रिकेटपटूंना मडगाव, मुरगाव, सांगे आदी भागापर्यंत प्रवास करणे अशक्य ठरायचे. ही उणीव आता धारबांदोडा पंचायत मैदानामुळे भरून निघेल, असे परेश फडते यांनी नमूद केले. आमच्या पंचायत मालकीचे मैदान होते, पण निधी नसल्यामुळे मैदानाची निगा राखणे कठीण ठरायचे. येथील युवा क्रिकेटपटूंना खेळण्यासाठी आणि सरावासाठी सुविधा उपलब्ध केल्याबद्दल आम्ही जीसीएचे आभारी आहोत, अशी भावना धारबांदोडा पंचायतीचे सदस्य यशवंत बांदोडकर यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या