गोव्याच्या क्रिकेट संघाचा प्रकाशझोतात सराव

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी तयारी करणारा गोव्याचा संघ पर्वरी येथे प्रकाशझोतात सराव करणार आहे. गोव्याचे स्पर्धेतील दोन सामने फ्लडलाईटमध्ये होतील.

पणजी: आगामी सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी तयारी करणारा गोव्याचा संघ पर्वरी येथे प्रकाशझोतात सराव करणार आहे. गोव्याचे स्पर्धेतील दोन सामने फ्लडलाईटमध्ये होतील. गोव्याच्या संघातील संभाव्य क्रिकेटपटू सध्या पर्वरी येथे मुख्य प्रशिक्षक दोड्डा गणेश यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याचा एलिट ड गटात समावेश आहे. या गटातील सामने मध्य प्रदेशमधील इंदूर येथे १० जानेवारीपासून जैवसुरक्षा वातावरणात खेळले जातील. गोव्याचे पाचपैकी दोन सामने गोवा प्रकाशझोतात होतील. त्यामुळे इंदूरला रवाना होण्यापूर्वी पांढऱ्या चेंडूने प्रकाशझोतात काही सामने खेळविण्याचे गोवा क्रिकेट असोसिएशनने ठरविल्याचे सूत्राने सांगितले. हे सराव सामने या आठवड्यात खेळले जातील. यजमान मध्य प्रदेश, सेनादल, सौराष्ट्र, विदर्भ आणि राजस्थान हे गोव्याच्या गटातील अन्य संघ आहेत. गोव्याचा पहिला सामना १० जानेवारी मध्य प्रदेशविरुद्ध संध्याकाळी सात वाजल्यापासून प्रकाशझोतात होईल. याशिवाय १५ जानेवारीस सौराष्ट्रविरुद्ध गोवा प्रकाशझोतात खेळेल. याशिवाय १२ जानेवारीस सेनादलविरुद्ध, १६ जानेवारीस राजस्थानविरुद्ध, तर १८ जानेवारीस विदर्भविरुद्ध गोवा दुपारी १२ वाजल्यापासून सामना खेळेल.

संबंधित बातम्या