स्नेहल गोव्याच्या फलंदाजीतील आधारस्तंभ

snehal kauthankar
snehal kauthankar

किशोर पेटकर

पणजी

स्वप्नील अस्नोडकर आणि सगुण कामत या गोव्याच्या सफल अनुभवी क्रिकेटपटूंच्या निवृत्तीनंतर, २४ वर्षीय स्नेहल कवठणकर याच्यावर फलंदाजीत मोठी जबाबदारी आहे. मागील काही मोसमातील या शैलीदार फलंदाजाची कामगिरी पाहता, तो संघाचा आधारस्तंभ ठरत असून अपेक्षांना जागताना दिसतो.

स्नेहलने गतमोसमातील रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट गटातील ९ सामन्यांत ६६.४४च्या सरासरीने ५९८ धावा केल्या. मोसमात पाचशेहून जास्त धावा करण्याची त्याची ही तिसरी वेळ ठरली. त्याने २०१६-१७ मोसमातील ९ सामन्यांत ६९६ धावा केल्या होत्या, तर २०१८-१९ मोसमातील ९ सामन्यांत ५०९ धावा केल्या होत्या. त्याने आतापर्यंत रणजी स्पर्धेत चाळीसपेक्षा जास्तच्या सरासरीने दोन हजाराहून जास्त धावा केल्या आहेत.

गतमोसमात स्नेहल संघाचा उपकर्णधार होता. गोव्याच्या वयोगट संघातून खेळताना यशस्वी ठरल्यानंतर, स्नेहलने २०१४-१५ मोसमात ६ ते ८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत ओंगोले येथे झालेल्या आंध्रविरुद्धच्या लढतीने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेस सुरवात केली. लगेच पुढच्या मोसमात त्याने हिमाचलविरुद्ध धरमशाला येथे पहिल्या रणजी क्रिकेट शतकाची नोंद करताना १०१ धावांची खेळी केली. २०१६-१७ मोसमात स्नेहलने कारकिर्दीतील पहिले द्विशतक नोंदविले. गाजियाबाद येथे त्याने हरियानाविरुद्ध २२५ धावांची खेळी केली.

कारकिर्दीतील पाच रणजी शतकांपैकी दोन शतके स्नेहलने गतमोसमात पर्वरी येथे अनुक्रमे सिक्कीम व मेघालयाविरुद्ध नोंदविली. मात्र पर्वरी येथेच चंडीगडविरुद्ध त्याने दुसऱ्या डावात केलेली खेळी महत्त्वपूर्ण ठरली. जबाबदारीने खेळताना स्नेहलने नाबाद ३० धावा केल्या. सामन्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या सत्रात चंडीगडच्या गोलंदाजांचे वर्चस्व असताना, स्नेहलची फलंदाजी गोव्यासाठी निर्णायक ठरली. आगामी मोसमातही स्नेहलकडून अशाप्रकारे जबाबदार फलंदाजी अपेक्षित असेल.

स्नेहलची रणजी क्रिकेट कारकीर्द

- ३७ सामन्यांतील ६३ डावांत २३०० धावा

- ५ शतके, १० अर्धशतके, ४१.८१ सरासरी

- हिमाचल (१०१), हरियाना (२२५), जम्मू-काश्मीर (नाबाद १३०), सिक्कीम (१३४), मेघालय (१७९) या संघांविरुद्ध शतके

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com