कोलकातास्थित 'सेलव्हेल'बरोबर गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉलमध्ये नवी भागीदारी

गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) कोलकातास्थित सेलव्हेल यांच्याशी केलेल्या भागीदारीमुळे यंदा गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेस तब्बल सात वर्षांनंतर पुरस्कर्ता गवसला आहे.

पणजी  :  गोवा फुटबॉल असोसिएशनने (जीएफए) कोलकातास्थित सेलव्हेल यांच्याशी केलेल्या भागीदारीमुळे यंदा गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेस तब्बल सात वर्षांनंतर पुरस्कर्ता गवसला आहे. यासंदर्भात सामंजस्य करारावर सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर स्वाक्षरी झाली. 

‘‘मला लीग भव्य स्वरूपात आयोजित करायची आहे. सहभागी १२ क्लबना ही लीग अतिशय चांगल्या पद्धतीने घेण्यासाठी सहकार्याची विनंती करत आहे. सेलव्हेलच्या सहकार्यामुळे मी आनंदित असून गोव्यातील फुटबॉलला मोठ्या प्रमाणात हातभार लागत आहे. यंदा फक्त प्रोफेशनल लीग असेल, येत्या वर्षात जीएफएच्या अन्य लीगनाही त्यांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे,’’ असे करार जाहीर केल्यानंतर जीएफएचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी सांगितले. 
जीएफएला राज्य सरकार आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघासोबत (एआयएफएफ) चांगले संबंध राखायचे आहेत. त्यांच्यासोबतच्या चांगल्या संबंधांमुळे यावेळी सरकारकडून आर्थिक निधी मिळू शकला. आमच्या संघटनेला मुख्यमंत्र्यांनी दोन कोटी रुपयांच्या निधीचे आश्वासन दिले आहे. त्यापैकी पन्नास लाख रुपये मजून झाले असून निधी लवकरच मिळेल, अशी माहिती चर्चिल यांनी दिली. 

सेलव्हेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राजीव घोष यांनी सांगितले, की ‘‘जीएफएसोबतच्या भागीदारीतीली प्रवासात कितीतरी स्वप्ने प्रत्यक्षात येतील. आमच्या कंपनीला ग्रासरूट फुटबॉलशी सहयोगी बनणे आवडेल. जीएफएला आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू. अधिक काळ सोबत राहण्यास ते सांगतील अशी आशा बाळगतो.’’ जीएफए प्रोफेशनल लीगचे थेट प्रक्षेपण होणार आहे. त्यामुळे असंख्य लोकांना गोमंतकीय फुटबॉल पाहता येईल, असे घोष यांनी नमूद केले. यावेळी पुरस्कर्ते करार प्रत्यक्षात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या चर्चिल ब्रदर्स संघाच्या सीईओ वालंका आलेमाव, जीएफए उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय समिती सदस्य, प्रो-लीग संघांचे प्रतिनिधी, पॅरॅलल थिंकर्सचे पार्थ आचार्य यांची उपस्थिती होती.

स्पर्धा १५ जानेवारीपासून

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेस १५ जानेवारीपासून सुरवात होईल आणि स्पर्धा एप्रिलअखेरपर्यंत चालेल, अशी माहिती जीएफएचे स्पर्धा समिती अध्यक्ष डॉमनिक परेरा यांनी दिली. कोविड-१९ महामारीमुळे स्पर्धा सिंगल लेग पद्धतीने खेळली जाईल. स्पर्धेत एकूण ६६ सामने होतील, असे परेरा यांनी नमूद केले.

संबंधित बातम्या