Goa Football Association: गोव्यातील फुटबॉल मोसम यंदाही लांबणीवर?

दैनिक गोमंतक
मंगळवार, 18 मे 2021

30 एप्रिलला स्पर्धेची समाप्ती झाली. या कालावधीत काही सामने कोरोना बाधितांमुळे प्रभावितही झाले होते.

पणजी: कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीमुळे राज्यातील परिस्थिती लक्षात घेता गोवा फुटबॉल असोसिएशनचा (GFA) नवा मोसम यंदाही लांबण्याची चिन्हे आहेत. जीएफएने गतमोसमातील गोवा प्रोफेशनल लीग (Goa Professional League) फुटबॉल स्पर्धा जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरू केली. 30 एप्रिलला स्पर्धेची समाप्ती झाली. या कालावधीत काही सामने कोरोना बाधितांमुळे प्रभावितही झाले होते. याशिवाय मोसमात जीएफएने महिला लीग फुटबॉल स्पर्धाही पूर्ण केली, मात्र प्रथम विभागीय, द्वितीय आणि तृतीय विभागीय, तसेच विविध वयोगट स्पर्धा महामारीमुळे घेता आल्या नव्हत्या. याशिवाय नोव्हेंबर ते मार्च या कालावधीत गोव्यात इंडियन सुपर लीग (ISL), तर एप्रिलमध्ये एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील सामनेही झाले होते. कोविड-19 महामारीच्या राज्यातील पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जास्त धोकादायक ठरली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यसुरक्षेची खातरजमा केल्याशिवाय जीएफए स्पर्धा घेण्याबाबत धोका पत्करणार नाही असे सूत्राने सांगितले.(Goa football season postponed again)

I-League: फुटबॉल स्पर्धेतून यंदा बढती रद्द होण्याचे संकेत

दरम्यान, काल कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीच्या पार्श्वभूमीवर आय-लीग फुटबॉल (I League Football Tournament) स्पर्धेतून यंदा पदावनती रद्द होण्याचे काळ संकेत दिले होते. त्या अनुषंगाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या लीग कमिटीने शिफारस केली होती. एआयएफएफच्या लीग कमिटीची शिफारस मंजूर झाल्यास मणिपूरच्या नेरोका एफसी संघाचे 2021-22 मोसमातील आय-लीग स्पर्धेतील स्थान अबाधित राहील. जगभरातील 23 देशांच्या फुटबॉल लीगमधून महामारीच्या कारणास्तव पदावनती रद्द करण्यात आली आहे, जेणेकरून सध्याच्या कठीण परिस्थितीत संघांना मदत व्हावी हा हेतू आहे. भारतातील आय-लीगमध्येही असाच निर्णय व्हावा असे लीग कमिटीने सुचविले होते. यासंदर्भात एआयएफएफचे तांत्रिक संचालक दोरू आयजेक यांनी सादरीकरण केले. त्यास आय-लीग क्लबनीही सहमती दर्शविली असल्याचे एआयएफए लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनंदो धर यांनी नमूद केले होते. 

 

संबंधित बातम्या