मनोहर पर्रीकर ऑनलाईन बुद्धिबळात परदेशी खेळाडू

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

या स्पर्धेत अर्जेंटिना, कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेतील खेळाडूंनी नावनोंदणी केली असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत १६३ प्रवेशिकांची नोंदणी झाली होती.

पणजी: गोवा बुद्धिबळ संघटनेच्या मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा मालिकेतील दुसरा टप्पा रविवारी (ता. १३) रंगणार आहे. या स्पर्धेत अर्जेंटिना, कॅनडा, इंग्लंड, अमेरिकेतील खेळाडूंनी नावनोंदणी केली असून शुक्रवारी संध्याकाळपर्यंत १६३ प्रवेशिकांची नोंदणी झाली होती.

ब गट बुद्धिबळ स्पर्धेत २००० एलो गुणांपेक्षा कमी मानांकन असलेले बुद्धिबळपटू भाग घेणार आहेत. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात क गटात १६०० एलो गुणांपेक्षा कमी मानांकन असलेले खेळाडू होते. या गटातील स्पर्धा ६ सप्टेंबरला झाली होती. त्या स्पर्धेत भारतासह कॅनडा, दक्षिण आफ्रिका, अमेरिकेतील मिळून ३३५ स्पर्धक सहभागी झाले होते. क गट स्पर्धेप्रमाणेच ब गट स्पर्धाही १३ फेऱ्यांची असेल. त्यानंतर २० सप्टेंबरला ड (ओपन बुलेट) आणि ई (चेस ९६०) गटातील स्पर्धा होईल.

ब गट स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या खेळाडूंत सध्या अर्जेंटिनाचे दोघे खेळाडू आहेत. सध्याच्या प्रवेशिकांत काम्पितेल्ली गोन्झालो गार्सिया (एलो १९६६) अव्वल मानांकित, तर सर्जिओ लाझ्झारी (१९२३) चौथा मानांकित आहे. इंग्लंडची रितिका मालाडकर (१५७९) हिने प्रवेशिका नोंदणी केली आहे. कॅनडाचा एरन रीव्ह मेंडिस (१५२०) व अमेरिकेचा मयूर गोंधळेकर हे खेळाडू क गट स्पर्धेतही सहभागी झाले होते. त्यात एरन याला साडेदहा गुणांसह चौथा क्रमांक मिळाला होता. मयूर याने सात गुण नोंदविले होते. स्पर्धेला रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरवात होईल. 

मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाईन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धा मालिकेतील महत्त्वाची ग्रँडमास्टर खुली अ गट स्पर्धा दोन ऑक्टोबरला खेळली जाईल. या गटात २००० एलोपेक्षा जास्त गुण असलेले बुद्धिबळपटू भाग घेऊ शकतील. कोरोना विषाणू महामारीमुळे मनोहर पर्रीकर गोवा आंतरराष्ट्रीय खुली ग्रँडमास्टर स्पर्धा घेणे शक्य न झाल्यामुळे गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे ऑनलाईन स्पर्धा घेण्यात येत आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या