गोवा ग्रँडमास्टर बुद्धिबळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर

किशोर पेटकर
रविवार, 16 ऑगस्ट 2020

सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाच गटात स्पर्धा; आतापर्यंत ३५ देशातील प्रवेशिका

पणजी,

मनोहर पर्रीकर आंतरराष्ट्रीय गोवा ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा मागील जूनमध्ये कोरोना विषाणू महामारीमुळे होऊ शकली नाही, आता स्पर्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ब्लिट्झ प्रकारात घेण्याचे गोवा बुद्धिबळ संघटनेने ठरविले आहे.

स्पर्धा ६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत पाच गटात खेळली जाईल. स्पर्धेत एकूण १,२०,००० रुपयांची बक्षिसे असतील आणि आतापर्यंत ३५ देशांतील बुद्धिबळपटूंनी ऑनलाईन प्रवेशिका सादर केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष, राज्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली. त्यांच्या हस्ते स्पर्धेच्या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन झाले. कोविड-१९ परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर मुख्य ग्रँडमास्टर स्पर्धा घेतली जाईल, तसेच ऑनलाईन स्पर्धाही कायम ठेवली जाईल, असे काब्राल यांनी नमूद केले. एकूण ५० देशातील बुद्धिबळपटू ऑनलाईन स्पर्धेत भाग घेण्याचा विश्वास आयोजकांना वाटतो.

मुख्य स्पर्धा अ गटात ग्रँडमास्टर पातळीवर असेल. त्यात २००० पेक्षा एलो गुण असलेले बुद्धिबळपटू सहभागी होतील. ही स्पर्धा २ ऑक्टोबरला होईल. ऑनलाईन मालिकेतील पहिली स्पर्धा ६ सप्टेंबरला खेळली जाईल. ही स्पर्धा १६०० खाली एलो गुण असलेल्या बुद्धिबळपटूंसाठी असेल. ब गटात २००० खालील एलो गुण असलेले स्पर्धक भाग घेतील. ही स्पर्धा १३ सप्टेंबरला खेळली जाईल. २० सप्टेंबरला दोन स्पर्धा होतील. यामच गट डमध्ये ओपन बुलेट व गट कमध्ये चेस ९६० प्रकाराचा समावेश आहे.

गोवा बुद्धिबळ संघटनेचे संचालक किशोर बांदेकर स्पर्धा संचालक आहेत. अरविंद म्हामल, संजय कवळेकर, आशेष केणी, संजय बेलुरकर हे सहसंचालक आहेत. व्ही. एल. आनंद बाबू स्पर्धेचे मुख्य आर्बिटर आहेत. स्पर्धेला तांत्रिक सहकार्य chezzcircle.com  यांचे लाभेल. ऑनलाईन स्पर्धेत फसवणुकीचे प्रकार घडू नयेत यासाठी कडक उपाययोजना असेल, असे संघटनेतर्फे नमूद करण्यात आले आहे.  

 

यापूर्वीच्या दोन स्पर्धेत...

गोवा ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेला २०१८ साली सुरवात झाली. त्यावर्षी इराणचा ग्रँडमास्टर इदानी पौया याने स्पर्धेतील पहिला विजेता हा मान मिळविला होता. गतवर्षी ही स्पर्धा १८ ते २५ जून या कालावधीत झाली होती. आर्मेनियाचा ग्रँडमास्टर सामवेल तेर-साहाक्यान विजेता ठरला होता. आर्मेनियाचा ग्रँडमास्टर मॅन्युएल पेट्रोस्यान याला उपविजेतेपद मिळाले, तर इराणचा ग्रँडमास्टर माजी विजेता इदानी पौया तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता. यावर्षीची स्पर्धा २ ते ९ जून या कालावधीत नियोजित होती, पण कोविड-१९ मुळे अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने देशातील सर्व स्पर्धा रद्द केल्या.

संपादन - तेजश्री कुंभार 

संबंधित बातम्या