गोवा एएफसी चँपियन्स लीगच्या ई गटात

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेस पात्र ठरलेला पहिला भारतीय संघ एफसी गोवा पश्चिम विभागीय ई गटात खेळणार आहे.

पणजी : एएफसी चँपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेस पात्र ठरलेला पहिला भारतीय संघ एफसी गोवा पश्चिम विभागीय ई गटात खेळणार आहे. स्पर्धेचा ड्रॉ बुधवारी काढण्यात आला.

एफसी गोवासह ई गटात इराणमधील विजेता पर्सेपोलिस व कतारचा उपविजेता अल रय्यान या संघांचा समावेश आहे. गटातील चौथ्या स्थानासाठी संयुक्ती अरब अमिरातीतील अल वाहदा आणि इराकचा अल झावरा यांच्यात प्ले-ऑफ लढत होईल. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतील पश्चिम विभागीय सामने 14 ते 30 एप्रिल या कालावधीत नियोजित आहेत. सामन्याचे सविस्तर वेळापत्रक आणि स्थळ आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) नंतर जाहीर करेल.

कठीण गट -

एफसी गोवाचा हा गट कठीण मानला जातो. पर्सेपोलिस संघ 2020 मधील एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेत उपविजेता ठरला होता. एएफसी चँपियन्स लीगच्या पश्चिम विभागात ते गतमोसमात विजेते होते. पर्सियन गल्फ प्रो-लीग स्पर्धेतील ते सलग चार वेळचे विजेते आहेत. अल रय्यान संघ कतारमधील स्टार्स लीग स्पर्धेतील आठ वेळचा विजेता संघ आहे. 2019-20 मध्ये ते कतार स्टार्स लीगमध्ये उपविजेते ठरले होते. "एएफसी चँपियन्स लीग ही आशियातील मोठी स्पर्धा असल्यामुळे आम्ही खडतर आव्हानाची अपेक्षा बाळगली आहे. संघासाठी ही फार मोठी संधी असून खेळाडूंना बहुमुल्या अनुभव प्राप्त होईल," असे एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक ज्युआन फेरांडो यांनी सांगितले.

पहिला भारतीय क्लब - 

गतमोसमात (2019-20) इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत साखळी विजेतेपद मिळवून एफसी गोवाने आशियातील या प्रतिष्ठित स्पर्धेसाठी पात्रता मिळविली आहे. या स्पर्धेत खेळणारा एफसी गोवा पहिला भारतीय क्लब आहे. "प्रत्येक सामन्यात विजयाचे पूर्ण तीन गुण ही एफसी गोवा संघाची मानसिकता आहे. एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतील सामने खूपच कठीण असतील, पण त्यामुळे आम्हाला आमच्या मानसिकतेपासून दूर जाता येणार नाही," असे फेरांडो स्पर्धेतील आगामी मोहिमेविषयी म्हणाले.
 

संबंधित बातम्या