गोव्याचे चौघेच गोलंदाज ‘शतकवीर’

किशोर पेटकर
सोमवार, 6 जुलै 2020

रणजीत अविनाशशदाबसौरभअमित यांनी गाठला शंभर बळींचा टप्पा

पणजी,

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बळींचे शतक पार केलेले गोव्याचे चौघेच गोलंदाज आहेत. यामध्ये शदाब जकाती व अमित यादव या फिरकीतर अविनाश आवारे व सौरभ बांदेकर या वेगवान गोलंदाजांनी शंभर गडी बाद करण्याचा पराक्रम बजावला आहे.

अविनाश आवारे हा गोव्यातर्फे रणजी क्रिकेट स्पर्धेत शंभर गडी बाद करणारा पहिला गोलंदाज आहे. २००५ मध्ये सौराष्ट्रविरुद्ध राजकोट येथे त्याने मैलाचा दगड पार केला. त्याने एकूण १०३ गडी बाद केले आहेत.

आयपीएल क्रिकेट स्पर्धा गाजविलेला डावखुरा फिरकी गोलंदाज शदाब जकाती गोव्यातर्फे सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. ९० रणजी क्रिकेट सामन्यांत त्याने २७१ बळी चटकावले. शदाबने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकंदरीत २७५ गडी बाद केले आहेत. त्यापैकी ४ विकेट्स त्याने दुलिप करंडक स्पर्धेत दक्षिण विभागाचे प्रतिनिधित्व करताना मिळविले आहेत.

रणजी क्रिकेट स्पर्धेत दोनशेहून जास्त गडी बाद करणारा शदाब गोव्याचा एकमेव गोलंदाज आहे. शदाबने २००८ मध्ये नवी दिल्लीच्या कर्नेल सिंग स्टेडियमवर बंगालविरुद्ध शतकी टप्पा गाठलातर २०१५ मध्ये पर्वरी येथे सेनादलाविरुद्ध रणजी स्पर्धेत बळींचे द्विशतक नोंदविले.

भारताच्या १९ वर्षांखालील संघातून खेळलेला वेगवान गोलंदाज सौरभ बांदेकर बळी घेण्याच्या यादीत शदाबनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ६३ सामन्यांत १७० विकेट्स मिळविल्या आहेत. सौरभने दुलिप स्पर्धेतही दक्षिण विभागाकडून एक गडी बाद केला आहे. त्यामुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावे एकूण १७१ विकेट्स आहेत.

ऑफस्पिनर अमित यादवने ३७ सामन्यांत १२३ विकेट्स मिळविल्या आहेत. गोव्याकडून सर्वाधिक गडी बाद करणाऱ्यांत तो तिसरा आहे. वेगवान गोलंदाज रॉबिन डिसोझा याला मात्र बळींचे शतक थोडक्यात हुकले. ४३ सामन्यात त्याने ९५ गडी बाद केले आहेत. गोव्याच्या सक्रिय गोलंदाजांत डावखुरा फिरकीपटू दर्शन मिसाळ शंभर विकेट्स मिळवू शकतो. सध्या त्याने ५४ सामन्यांतून ८३ विकेट्स टिपल्या आहेत.

 

अविनाश सर्वांत वेगवान

रणजी क्रिकेट स्पर्धेत गोव्यातर्फे कमी सामन्यांत बळींचे शतक गाठण्याचा मान अविनाशने मिळविला आहे. त्याने कारकिर्दीतील २८व्या रणजी सामन्यात शंभरावा गडी बाद केला. अमित यादवने ३१व्यातर सौरभ बांदेकरने ३२व्या सामन्यात हा टप्पा गाठला. शदाबने ४०व्या सामन्यात बळींचे शतक गाठल्यानंतर ७२व्या सामन्यात द्विशतकी बळी प्राप्त केला.

 

गोव्याचे आघाडीचे रणजी गोलंदाज

गोलंदाज सामने विकेट्स सरासरी डावातउत्कृष्ट

शदाब जकाती ९० २७१ ३१.७ ८-५३

सौरभ बांदेकर ६३ १७० ३५.५ ६-७५

अमित यादव ३७ १२३ २७.४ ७-६८

अविनाश आवारे २८ १०३ २७.८ ६-८५

संबंधित बातम्या