गोव्याचा संयमी सलामीवीर सुमीरन

किशोर पेटकर
शनिवार, 12 सप्टेंबर 2020

गोव्याच्या रणजी क्रिकेट संघात पदार्पण करण्यासाठी प्रतीक्षा केलेल्या सुमीरन आमोणकर याने चार मोसमात संघातील हुकमी सलामीवीर बनण्याइतपत मजल मारली आहे. गतमोसमातील प्लेट गटात तीन शतकांसह ६४६ धावा करताना त्याने चंडीगडविरुद्ध सामना वाचविणारी महत्त्वपूर्ण संयमी खेळी केली होती.

पणजी: गोव्याच्या रणजी क्रिकेट संघात पदार्पण करण्यासाठी प्रतीक्षा केलेल्या सुमीरन आमोणकर याने चार मोसमात संघातील हुकमी सलामीवीर बनण्याइतपत मजल मारली आहे. गतमोसमातील प्लेट गटात तीन शतकांसह ६४६ धावा करताना त्याने चंडीगडविरुद्ध सामना वाचविणारी महत्त्वपूर्ण संयमी खेळी केली होती.

गतमोसमात (२०१९-२०) गोव्याने प्लेट गटात अव्वल स्थान मिळवत रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्याचा मान मिळविला होता. या मोहिमेत पर्वरी येथे चंडीगडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला असता, तर कदाचित गोव्याच्या वाटेत अडथळा आला असता. पहिल्या डावात ३२९ धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर २९ वर्षीय सुमीरनने नाईट वॉचमन अमूल्य पांड्रेकरच्या साथीत सामन्याच्या शेवटच्या चौथ्या दिवशी किल्ला लढविला. त्यामुळे गोव्याला नंतर स्नेहल कवठणकर याच्याही संयमी फलंदाजीमुळे ६ बाद २५३ धावा करून लढत अनिर्णित राखणे शक्य झाले. सुमीरन आणि अमूल्य यांनी संथगती अर्धशतके नोंदविताना चंडीगडच्या प्रभावी वेगवान व फिरकी माऱ्याचा समर्थपणे सामना केला. त्यांनी ६०.२ षटकांत तिसऱ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी केली. या जोडीने गोव्याचा डाव गुंडाळण्यास चंडीगडच्या गोलंदाजांना पुरेसा वेळ मिळणार नाही याची खबरदारी घेतली. सुमीरनने २९० चेंडूंत ६४, तर अमूल्यने १८३ चेंडूंत ६० धावा केल्या. २०१८-१९ मोसमात धावांसाठी झगडावे लागल्यानंतर सुमीरनने गतमोसमात आत्मविश्वासाने फलंदाजी केली.

गोव्याच्या वयोगट संघातून चमकल्यानंतर सुमीरनला रणजी संघात प्रवेश करण्यासाठी वाट पाहावी लागली. २० ते २३ ऑक्टोबर २०१६ या कालावधीत ओडिशातील कटक येथे झालेल्या सेनादलाविरुद्धच्या लढतीत या मडगावच्या फलंदाजास पहिल्यांदाच रणजी कॅप मिळाली. त्याचे पदार्पण गोव्यातर्फे विक्रमी ठरले. रणजी क्रिकेट पदार्पणात शतक ठोकणारा तो गोव्याचा पहिलाच फलंदाज ठरला. सुमीरनने १९५ चेंडूंत १०१ धावा केल्या. त्याने कर्णधार सगुण कामतसह दुसऱ्या विकेटसाठी २३७ धावांची भागीदारी केली. याच लढतीत डावखुऱ्या सगुणने नाबाद ३०४ धावा करून गोव्यातर्फे विक्रमी वैयक्तिक धावसंख्या नोंदविली. 

अतिशय संयमाने, शांत आणि एकाग्र चित्ताने फलंदाजी करणे हे सुमीरनचे वैशिष्ट्य. त्याची फलंदाजी अत्यंत चिवट. चार दिवसीय सामन्यात फलंदाजी करताना त्याचे लक्ष धावगतीकडे अजिबात नसते. तो खराब चेंडूची वाट पाहत असतो. संघाच्या डावाची भक्कम उभारणी करणे हेच त्याचे ध्येय असते. त्यामुळे सहकाऱ्यांसमवेत मोठी भागीदारी रचणे त्याला शक्य होते. गतमोसमात पर्वरी येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध त्याने वैभव गोवेकर याच्यासमवेत ३१६ धावांची सलामी दिली. गोव्याच्या रणजी क्रिकेट इतिहासात ही विक्रमी भागीदारी आहे. त्याच डावात त्याने कारकिर्दीतील वैयक्तिक सर्वोत्तम १६० धावांची खेळी केली. त्यापूर्वी २०१७-१८ मोसमात धरमशाला येथे हिमाचलविरुद्ध दुसऱ्या डावात सुमीरनने स्वप्नील अस्नोडकरच्या साथीत २९९ धावांची सलामी दिली होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या