अहमदाबादच्या एआरए फुटबॉल संघात गोव्याचे खेळाडू

क्रीडा प्रतिनिधी
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

अहमदाबादच्या एआरए एफसी संघाने आगामी द्वितीय विभाग आय-लीग स्पर्धेसाठी गोव्याच्या फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. यामध्ये धेंपो स्पोर्टस क्लबचा बचावपटू निक्सन कास्ताना, आल्बर गोन्साल्विस व स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचा गोलरक्षक मेलरॉय फर्नांडिस यांचा समावेश आहे.

पणजी: अहमदाबादच्या एआरए एफसी संघाने आगामी द्वितीय विभाग आय-लीग स्पर्धेसाठी गोव्याच्या फुटबॉलपटूंना करारबद्ध केले आहे. यामध्ये धेंपो स्पोर्टस क्लबचा बचावपटू निक्सन कास्ताना, आल्बर गोन्साल्विस व स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाचा गोलरक्षक मेलरॉय फर्नांडिस यांचा समावेश आहे.

द्वितीय विभाग स्पर्धेद्वारे आय-लीगच्या अव्वल श्रेणीसाठी पात्र ठरण्यासाठी एआरए एफसी संघ प्रयत्नशील आहे. कुडतरी येथील निक्सन धेंपो स्पोर्टस क्लब संघात असताना आर्मांद कुलासो व मॉरिसियो आफोन्सो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळला आहे. चर्चिल ब्रदर्सतर्फे त्याने आय-लीग स्पर्धेचा अनुभव प्राप्त केला आहे. त्यानंतर गतमोसमात तो पुन्हा धेंपो क्लब संघात रुजू झाला. 

गोलरक्षक मेलरॉय २७ वर्षांचा असून तो धर्मापूर येथील आहे. वयोगट पातळीवर साळगावकर एफसीचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, त्याला चर्चिल ब्रदर्स संघात संधी मिळाली. त्यानंतर तो स्पोर्टिंग क्लब संघात दाखल झाला. या संघात असताना तो दोन वेळा गोवा प्रो-लीग विजेतेपदाचा मानकरी ठरला आहे. संतोष करंडक राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत तो गोव्याच्या संघातून खेळला आहे. पाच वेळा तो राष्ट्रीय स्पर्धेत चमकला आहे.

विंगर असलेला आल्बर २७ वर्षांचा आहे. गोव्यातील संघातर्फे तो १६ आय-लीग सामने खेळला आहे. स्पोर्टिंग क्लब द गोवा संघातर्फे व्यावसायिक फुटबॉल कारकीर्द सुरू केल्यानंतर त्याने फतेह हैदराबाद संघाचेही प्रतिनिधित्व केले. ती वर्षांपूर्वी तो चर्चिल ब्रदर्स संघात दाखल झाला. गतमोसमात त्याने धेंपो स्पोर्टस क्लबशी करार केला. आगामी द्वितीय विभाग आय-लीग स्पर्धेत त्याच्यावर एआरए एफसीच्या आक्रमणाची धुरा राहील.

संबंधित बातम्या