
Prize Distribution Ceremony: यशस्वी ठरण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नसून मेहनत व जिद्द या जोरावर खेळाडू अढळ स्थान मिळवतो, असे प्रतिपादन क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी केले. ते राज्यातील क्रीडापटूंच्या रोख रक्कम बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते.
राज्यातील 162 क्रीडापटूंना बक्षिसांतर्गत एकूण 98 लाख 73 हजार रोख रक्कम वितरीत करण्यात आली.
यामध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके जिंकलेल्या 147 क्रीडापटूंना 28 लाख 23 हजार रुपये, तर बर्लिन-जर्मनी येथे झालेल्या स्पेशल ऑलिंपिक स्पर्धेत पदके जिंकलेल्या 15 खेळाडूंना 70 लाख 50 हजार रुपये देण्यात आले.
क्रीडामंत्री गावडे म्हणाले, ‘‘गोव्यातील युवा आपले ध्येय साध्य करण्यासाठी आणि क्रीडा क्षेत्रात यश मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित करून रात्रंदिवस मेहनत घेत आहेत, हे पाहून खूप आनंद होत आहे.
आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण परिश्रम केल्याने यश मिळते आणि ही बाब या यशस्वी खेळाडूंत दिसून आली.’’
यावेळी समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांचीही उपस्थिती होती. चांगले खेळाडू घडविण्यासाठी चांगले प्रशिक्षक, चांगल्या सुविधा यांची गरज त्यांनी प्रतिपादली, तसेच अधिक मेहनत घेतल्यास चांगले खेळाडू तयार होतील असा विश्वासही व्यक्त केला.
सांगेसारख्या दुर्गम ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने क्रीडा सुविधांत सुधारणा करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
काही क्रीडा संघटनांकडून ‘राजकारण’
गोव्यातील खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार इतर क्रीडा संघटनांसह पुढाकार घेत आहे, मात्र काही क्रीडा संघटनांचे पदाधिकारी राजकारण करतात.
जर एखाद्या संघटनेकडून खेळाडूंवर अन्याय होत असेल, तर संबंधित खेळाडूंनी आम्हाला पत्र लिहावे. या पत्राची सरकारकडून दखल घेतली जाईल, असे आश्वासन क्रीडामंत्री गावडे यांनी यावेळी दिले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.