गोवा प्रो-लीग स्पर्धेचे प्रक्षेपण शक्य

किशोर पेटकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

आगामी फुटबॉल मोसमासाठी संभाव्य पुरस्कर्त्यांचा प्रस्ताव

पणजी

पुरस्कर्त्यांच्या माध्यमातून गोवा प्रो-लीग फुटबॉल सामन्यांचे ओटीटी माध्यमाद्वारे थेट प्रक्षेपण होणे शक्य आहे. तसा प्रस्ताव गोवा फुटबॉल असोसिएशनला (जीएफए) सादर करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, आगामी फुटबॉल मोसमातील गोवा प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा प्रायोजित करण्यासाठी दोघा पुरस्कर्तांचे प्रस्ताव जीएफएकडे आले असून संघटनेचे व्यवस्थापकीय समिती अंतिम निर्णय घेईल. एफसी गोवा संघ व्यवस्थापन आणि कोलकात्यातील आस्थापनाने स्पर्धा पुरस्कृत करण्यासाठी उत्सुकता दाखविली आहे. त्याअंतर्गत आर्थिक बाबींसह सामन्यांचे ओटीटी माध्यमाद्वारे प्रक्षेपणही केले जाईल. गोव्यातील फुटबॉल इतिहासात असे प्रथमच घडेल.

जीएफएची प्रो-लीग फुटबॉल स्पर्धा २०१४-१५ मोसमात शेवटच्या वेळेस पुरस्कृत होती, त्यानंतर गोव्यातील या प्रमुख स्पर्धेकडे पुरस्कर्त्यांनी पाठच फिरविली. जीएफएला प्रथम विभागीय आणि महिला लीगसाठी पुरस्कर्ते मिळाले, पण प्रो-लीग स्पर्धेचा खर्च संघटनेलाच उचलावा लागला. आगामी तीन मोसमासाठी प्रो-लीग स्पर्धा पुरस्कृत करण्यासाठी आता प्रस्ताव आल्याने संघटनेचा भार कमी होईल. पुरस्कर्त्यांमुळे संघटनेचे अर्थकारणही भक्कम होईल.

एफसी गोवाच्या प्रस्तावानुसार, प्रो-लीग स्पर्धा अधिक चुरसपूर्ण करण्यासाठी आणि स्थानिक गुणवत्तेला मोठे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने देशातील इतर क्लबच्या राखीव संघांना स्पर्धेत खेळण्यासाठी सशुल्क निमंत्रित करण्याचे नियोजन आहे. ऑगस्टमध्ये जीएफएच्या व्यवस्थापकीय समितीची ऑनलाईन माध्यमांद्वारे बैठक अपेक्षित असून तेव्हा पुरस्कर्त्यांसंबंधी निर्णय होऊ शकतो. कोरोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य फुटबॉल मोसमाचे नियोजनही त्या बैठकीत ठरू शकते, असे सूत्राने सांगितले.

संपादन -अवित बगळे

संबंधित बातम्या