कृष्णनाथच्या गोलमुळे कळंगुट विजयी

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 27 फेब्रुवारी 2021

कळंगुट असोसिएशनचा हा चार सामन्यातील दुसरा विजय ठरला.

पणजी: कृष्णनाथ शिरोडकर याने सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये नोंदविलेल्या गोलमुळे गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत कळंगुट असोसिएशनने गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला 3-2 फरकाने निसटते हरविले. सामना शनिवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये कृष्णनाथचे हेडिंग भेदक ठरले. निक्सन कास्ताना याचा फ्रीकिक फटका गोलपट्टीस आपटून माघारी आला असता कृष्णनाथने लक्ष्य साधले. त्यापूर्वी सिद्धांत शिरोडकरच्या दोन गोलमुळे कळंगुट असोसिएशनपाशी आघाडी होती. सिद्धांतने पहिला गोल तिसऱ्या, तर दुसरा गोल 46व्या मिनिटास केला. नंतर बसंत सिंग याने 54व्या आणि गिल्बर्ट ऑलिव्हेरा याने 81व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे गार्डियन एंजलने बरोबरी साधली होती.

कळंगुट असोसिएशनचा हा चार सामन्यातील दुसरा विजय ठरला. त्यांचे आता सहा गुण झाले आहेत. ते आता सहाव्या क्रमांकावर आले आहेत. गार्डियन एंजल क्लबला दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचे पाच लढतीनंतर पाच गुण कायम राहिले असून सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. स्पर्धेत रविवारी  म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर वास्को स्पोर्टस क्लब व वेळसाव क्लब यांच्यात सामना होईल.
 

संबंधित बातम्या