Goa Professional League: कळंगुटची बरोबरी स्पोर्टिंग क्लबला 2-2 मध्ये रोखले

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 29 मार्च 2021

कळंगुट असोसिएशनने भरपाई वेळेतील गोलसह स्पोर्टिंग क्लब द गोवा संघास 2-2 गोलबरोबरीत रोखले.

पणजी : सिद्धार्थ कुंडईकर याने दोन वेळा अचूक नेम साधताना चेंडूला योग्य दिशा दाखविली, त्यामुळे पिछाडीवर पडलेल्या कळंगुट असोसिएशनने भरपाई वेळेतील गोलसह स्पोर्टिंग क्लब द गोवा संघास 2-2 गोलबरोबरीत रोखले.

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेतील रंगतदार सामना रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. नायजेरियन आघाडीपटू फिलिप ओदोग्वू याने स्पोर्टिंग क्लबला आघाडी मिळवून दिली. त्यामुळे विश्रांतीला गतवेळचा संयुक्त विजेता संघ एका गोलने आघाडीवर होता. 53व्या मिनिटास सिद्धार्थने कळंगुटला बरोबरी साधून दिली. त्यानंतर 67व्या मिनिटास स्पोर्टिंगने पुन्हा आघाडी प्राप्त केली. मार्कुस मस्कारेन्हासने हा गोल केला. स्पोर्टिंग क्लब विजयाच्या दिशेने कूच करत असताना सिद्धार्थने थेट फ्रिकिकवर कळंगुटला बरोबरीचा एक गुण मिळवून दिला. (Goa Professional Leagu Calangutes equalizer kept Sporting Club at 2 2)

टी- ट्वेन्टी आणि कसोटीसाठी पाकिस्तानचा झिम्बॉब्वे दौरा

सुरवातीचे काही प्रयत्न हुकल्यानंतर स्पोर्टिंगने बरोबरी साधली. क्लाईव्ह मिरांडाच्या दूरवरील थ्रोईनवर फिलिप ओदोग्वू याने चेंडूवर ताबा मिळविला आणि नंतर कळंगुटचा बचावपटू मेल्विन लोबो याला गुंगारा दिल्यानंतर गोलरक्षक परमवीर सिंग याचा बचावही भेदला. नंतर काही वेळाने मेल्विनचा हेडर चुकल्यामुळे कळंगुटला बरोबरी साधता आली नाही. विश्रांतीपूर्वी अकेराज मार्टिन्स रिबाऊंड फटका योग्यपणे मारू शकला नाही, त्यामुळे स्पोर्टिंगची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली.

विश्रांतीनंतरच्या आठव्या मिनिटास कळंगुटच्या डॅरील कॉस्ता याने स्पोर्टिंगच्या रिंगणात जोरदार मुसंडी मारली आणि एल्टन वाझ याला चकविले. त्यानंतर डॅरीलने सिद्धार्थला अगदी जवळून गोल नोंदविण्याची संधी प्राप्त करून दिली आणि कळंगुटला बरोबरी साधता आली. मात्र चौदा मिनिटानंतर स्पोर्टिंगने पुन्हा आघाडी प्राप्त केली. आसुम्प्शन सुवारिसच्या फ्रीकिकवर एल्टन वाझच्या फटक्यावर मार्कुसने नेटसमोरून चेंडूला अचूक दिशा दाखविली. 86व्या मिनिटास कळंगुटच्या डॉमनिक फर्नांडिसचा सेटपिसेसवरील फटका दिशाहीन ठरल्यानंतर सिद्धार्थने फ्रीकिकवर बरोबरीचा गोल केला.

एफसी गोवा-गार्डियन एंजल लढतही बरोबरीत

धुळेर स्टेडियमवर रविवारीच प्रकाशझोतात झालेल्या आणखी एका सामन्यात एफसी गोवा आणि गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबने 1-1 गोलबरोबरीसह प्रत्येकी एक गुण प्राप्त केला. सामन्यातील दोन्ही गोल उत्तरार्धातील खेळात झाले. बदली खेळाडू जॉयबर्ट आल्मेदा याने 69व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे एफसी गोवास आघाडी मिळाली. त्याने व्हेलरॉय फर्नांडिसच्या क्रॉस पासवर हा गोल केला. सामन्याच्या 87व्या मिनिटास गार्डियन एंजलच्या खाती बरोबरीचा गोल नोंदीत झाला. जोएल बार्रेटो याने सणसणीत फटक्यावर एफसी गोवाचा गोलरक्षक डायलन डिसिल्वा याचा बचाव भेदला.
 

संबंधित बातम्या