Goa professional league: गार्डियन एंजलच्या विजयात बेनेस्टॉनची हॅटट्रिक

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 5 एप्रिल 2021

साळगावकर एफसीचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला.

पणजी: बेनेस्टॉन बार्रेटो याच्या शानदार हॅटट्रिकच्या बळावर गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत चमकदार विजयाची नोंद केली. त्यांनी माजी विजेत्या साळगावकर एफसीला 3-1 फरकाने पराभवाचा धक्का दिला.

सामना सोमवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. साळगावकर एफसीचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव ठरला. त्यांना मागील लढतीत पणजी फुटबॉलर्सने एका गोलने हरविले होते. स्पर्धेच्या गुणतक्त्यात तळाच्या भागात असलेल्या गार्डियन एंजल क्लबला या विजयामुळे दिलासा मिळाला. त्यांचा हा 10 सामन्यांतील दुसरा विजय असून आता 10 गुण झाले आहेत. पराभवामुळे साळगावकर एफसीला पुन्हा अव्वल स्थान मिळविणे शक्य झाले नाही. त्यांचा हा दुसरा पराभव ठरला. त्यामुळे नऊ लढतीनंतर 17 गुण कायम राहिले. स्पोर्टिंग क्लब द गोवापेक्षा त्यांचे दोन गुण कमी आहेत. (Goa professional league Benestones hat trick in Guardian Angels victory)

Goa Professional League: स्पोर्टिंग क्लबचा पंचतारांकित विजय

साळगावकर एफसीला सामन्याच्या पहिल्याच मिनिटास धक्का बसला. त्यांच्या बचावफळीतील त्रुटींचा लाभ उठवत बेनेस्टॉनने गार्डियन एंजलला आघाडी मिळवून दिली. जोएल बार्रेटोच्या शानदार असिस्टवर बेनेस्टॉनने लक्ष्य साधले. सामन्याच्या 16व्या मिनिटास साळगावकर एफसीने बरोबरी साधली. सेल्विन मिरांडांच्या अप्रतिम कॉर्नर किकवर स्टेफ्लॉन डिकॉस्ताचे हेडिंग भेदक ठरले. विश्रांतीला दोन्ही संघ 1-1 गोलबरोबरीत होते.

विश्रांतीनंतरचा खेळ सुरू झाल्यानंतर 53व्या मिनिटास बेनेस्टॉनने आणखी एक गोल करून गार्डियन एंजलला आघाडी मिळवून दिली. या गोलचे अर्धे श्रेय जोव्हियल डायस यालाही जाते. ज्योव्हियलने साळगावकर एफसीच्या बचावफळीत पूर्णतः चकवत गोलक्षेत्रात मुसंडी मारली आणि बेनेस्टॉनला गोल करण्याची सुरेख संधी प्राप्त करून दिली. सामन्याच्या 80व्या मिनिटास बेनेस्टॉनने हॅटट्रिकचा मान मिळविताना गार्डियन एंजलच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारा गोल केला. यावेळी बेनेस्टॉनचा जोरदार फटका साळगावकरचा गोलरक्षक जेसन डिमेलो याने रोखला, पण रिबाऊंडवर बेनेस्टॉनचा नेम अचूक ठरला. त्यापूर्वी सेल्विन मिरांडा याने समोर फक्त गार्डियन एंजलचा गोलरक्षक असताना दिशाहीन फटका मारला. त्यामुळे साळगावकर एफसीची सोपी संधी वाया गेली. 

 

संबंधित बातम्या