गोवा प्रोफेशनल लीग : पिछाडीवरून एफसी गोवा डेव्हलपमेंटलची बाजी

गोवा प्रोफेशनल लीग : पिछाडीवरून एफसी गोवा डेव्हलपमेंटलची बाजी
Goa Professional League FC Goa Development beats Calangute FC by 1 Goal

पणजी  : एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाने एका गोलच्या पिछाडीवरून बुधवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत विजयाचे पूर्ण तीन गुण प्राप्त केले. शेवटची अकरा मिनिटे दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या कळंगुट असोसिएशनला त्यांनी 2-1 फरकाने हरविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.दोन लढतीतील एफसी गोवाच्या पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब करताना एरेन डिसिल्वा याने दोन्ही गोल नोंदविले. त्याने सामन्यातील शेवटच्या दहा मिनिटांच्या खेळात दोन वेळा अचूक लक्ष्य साधले.

स्पर्धेतील पहिल्या पराभवामुळे कळंगुट असोसिएशनने दोन लढतीनंतर तीन गुण कायम राहिले. एरेनने 80व्या मिनिटास बरोबरीचा गोल केल्यानंतर या स्ट्रायकरने 88व्या मिनिटास संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. पहिला गोल त्याने सेरिनियो फर्नांडिसच्या क्रॉसपासवर केला. सामना संपण्यास दोन मिनिटे असताना दिशांक कुंकळ्ळीकरच्या असिस्टवर एरेनने अचूक हेडिंग साधले.

सामन्याच्या 36व्या मिनिटास जिर्जार तेरांग याने कळंगुट असोसिएशनला आघाडी मिळवून दिली होती. मात्र 79व्या मिनिटास तेरांग याला सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे रेड कार्ड मिळाल्यामुळे कळंगुटचा एक खेळाडू कमी झाला व त्याचा लाभ एफसी गोवा संघाने उठविला. स्पर्धेत आज सेझा फुटबॉल अकादमी व वेळसाव क्लब यांच्यात धुळेर-म्हापसा येथे सामना होईल.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com