Goa Professional League: एफसी गोवाला रोखत सेझाने साधली बरोबरी

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 एप्रिल 2021

कॅजिटन फर्नांडिसने रिबाऊंडवर गोल नोंदवत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सेझा फुटबॉल अकादमीस 2-2 गोलबरोबरी साधून दिली.

पणजी: सामन्याच्या इंज्युरी टाईममधील तिसऱ्या मिनिटास एफसी गोवाचा गोलरक्षक ह्रतिक तिवारी याने पेनल्टी फटका रोखला, पण कॅजिटन फर्नांडिसने रिबाऊंडवर गोल नोंदवत गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत सेझा फुटबॉल अकादमीस 2-2 गोलबरोबरी साधून दिली. सामना रविवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

पी. साजम याने 14व्या मिनिटास सेझा अकादमीस आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एफसी गोवा डेव्हलपमेंटल संघाने जोरदार मुसंडी मारली. 40व्या मिनिटास ख्रिस्ती डेव्हिस याने एफसी गोवास पेनल्टी फटक्यावर बरोबरी साधून दिल्यानंतर कपिल होबळे याने 75व्या मिनिटास माजी विजेत्यांना 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.(Goa Professional League FC Goa was stopped by Sejane)

सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये एफसी गोवाच्या कपिल होबळे याने पेनल्टी क्षेत्रात सेझा अकादमीच्या फहीझ महम्मद याला पाडले. यावेळी बदली खेळाडू कॅजिटन फर्नांडिसने पेनल्टी फटका मारला, पण गोलरक्षक ह्रतिक तिवारीने फटक्याचा अचूक अंदाज बांधला, मात्र चेंडू गोलपट्टीस लागून पुन्हा मैदानात आला असता रिबाऊंडवर कॅजिटनने चूक न करता सेझा अकादमीस बरोबरी साधून दिली. 

एएफसी चँपियन्स लीगमधील ऐतिहासिक गुणानंतर अल वाहदाविरुद्ध लढत

त्यापूर्वी 14व्या मिनिटास मायरन बोर्जिसच्या असिस्टवर शाजमच्या डाव्या पायाने मारलेल्या ताकदवान फटक्यासमोर एफसी गोवाचा गोलरक्षक तिवारी हतबल ठरला. विश्रांतीस पाच मिनिटे बाकी असताना एफसी गोवाच्या ब्रायसन फर्नांडिसचा फटका सेझा अकादमीच्या बचावपटू पेनल्टी क्षेत्रात हाताळला. त्यावेळी रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली, यावेळी ख्रिस्ती डेव्हिसने प्रतिस्पर्धी गोलरक्षकाचा अंदाज चुकवत एफसी गोवास बरोबरी साधून दिली. 

सामन्यातील पंधरा मिनिटे बाकी असताना कपिल होबळेच्या गोलमुळे एफसी गोवास आघाडी मिळाली. सेझा अकादमीच्या पेनल्टी क्षेत्रात एफसी गोवाच्या आयव्हन कॉस्ताचा हेडर मायरन बोर्जिसने रोखला, पण तो चेंडूवर ताबा राखू शकला नाही. यावेळी कपिलने वेळीच योग्य दिशेने फटका मारत सेझाच्या गोलरक्षकाला चकविले. 
 

संबंधित बातम्या