गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल : धेंपो क्लबची गार्डियन एंजलशी बरोबरी

गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल : धेंपो क्लबची गार्डियन एंजलशी बरोबरी
Goa Professional League Football tie between Dhempo Club and Guardian Angel

पणजी : धेंपो स्पोर्टस क्लबने एका गोलच्या पिछाडीनंतर गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला 2-2 गोलबरोबरीत रोखले. सामना शनिवारी म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सामन्याच्या 15व्या मिनिटाला गार्डियन एंजल क्लबने ज्योव्हियल डायसच्या गोलमुळे आघाडी घेतली. सामन्याच्या 58व्या मिनिटास शालम पिरीसच्या गोलमुळे धेंपो क्लबने बरोबरी साधली, रिचर्ड कार्दोझच्या कॉर्नर किकवर हा गोल झाला.

लेनी फर्नांडिसच्या स्वयंगोलमुळे धेंपो क्लबला उत्तरार्धात आघाडी घेता आली. सामना संपण्यास अकरा मिनिटे बाकी असताना धेंपो क्लबच्या उत्तम राय याचा फटका दिशाहीन करण्याच्या प्रयत्नात लेनी याने चेंडू आपल्याच नेटमध्ये मारला. सामन्याच्या अंतिम टप्प्यात ज्योएल बार्रेटो याने केलेल्या गोलमुळे गार्डियन एंजलला बरोबरीचा एक गुण मिळाला. गार्डियन एंजलचा गोलरक्षक प्रथीश व्हीट्टिल याची कामगिरी उल्लेखनीय ठरली. आघाडीपटू उत्तम राय याला दुखापत झाल्यामुळे सामन्यातील शेवटची आठ मिनिटे धेंपो क्लबला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. त्याचा फायदा उठवत गार्डियन एंजलले बरोबरी साधली.

धेंपो क्लबचे आता दोन लढतीनंतर चार गुण झाले आहेत. गार्डियन एंजल संघाचेही तेवढेच गुण झाले आहेत. स्पर्धेत आज पणजी फुटबॉलर्स व यूथ क्लब ऑफ मनोरा यांच्यात सामना होईल. मनोरा संघाचे स्पर्धेत पदार्पण आहे.
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com