Goa Professional League: गोकुळम केरळा आय-लीग विजेता

Goa Professional League: गोकुळम केरळा आय-लीग विजेता
Goa Professional League Gokulam Kerala I League winners

पणजी : गोकुळम केरळा संघाने एका गोलच्या पिछाडीनंतर जोरदार मुसंडी मारत विजयासह प्रथमच आय-लीग फुटबॉल स्पर्धा जिंकली. निर्णायक शेवटच्या फेरीत त्यांनी मणिपूरच्या टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियन (ट्राऊ) संघावर 4-1 फरकाने विजय मिळविला. सामना शनिवारी कोलकाता येथील किशोर भारती क्रीडांगणावर झाला. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये गोकुळम केरळाचा एक खेळाडू रेड कार्डमुळे कमी झाला.

गोव्याच्या दोन वेळच्या माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सनेही शेवटच्या लढतीत कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगणावर पंजाब एफसीला 3-2 फरकाने हरविले, पण त्यांना तिसऱ्यांदा आय-लीग स्पर्धा जिंकणे शक्य झाले नाही. ते स्पर्धेत तिसऱ्यांदा उपविजेते ठरले. (Goa Professional League Gokulam Kerala I League winners)

गोकुळम केरळा व चर्चिल ब्रदर्स यांचे 15 लढतीनंतर समान 29 गुण झाले, मात्र हेड-टू-हेड लढतीत गोकुळम केरळा संघाचे पारडे जड ठरले. स्पर्धेतील दोन लढतीनंतर गोकुळम केरळाने चर्चिल ब्रदर्सवर 5-2 गोलफरकाने आघाडी संपादली, जी निर्णायक ठरली. यंदा पहिल्या टप्प्यात चर्चिल ब्रदर्सने 3-2 फरकाने निसटता विजय मिळविला, मात्र दुसऱ्या टप्प्यात गोकुळम केरळाने 3-0 फरकाने चर्चिल ब्रदर्सला हरविले होते. स्पर्धेत एकंदरीत गोलसरासरीत गोकुळम केरळा +14 फरकाने सरस ठरला, तर चर्चिल ब्रदर्सची +5 गोलसरासरी राहिली.

गोकुळम केरळाची उत्तरार्धात मुसंडी

ट्राऊ संघ पूर्वार्धात एका गोलने आघाडी होता. विजेतेपदासाठी गोकुळम केरळास ही लढत जिंकणे अत्यावश्यक होते. व्हिन्सेन्झो आल्बर्टो अनेसे यांच्या मार्गदर्शनाखालील संघाने उत्तरार्धात जोरदार खेळ करत शेवटच्या एकवीस मिनिटांत चार गोल नोंदवून चार गोल नोंदवून आय-लीग विजेतेपदावर नाव कोरले. त्यांचा हा 15 लढतीतील नववा विजय ठरला. ट्राऊ संघाला तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे 15 लढतीनंतर 26 गुणांसह त्यांचा तिसरा क्रमांक कायम राहिला. बिद्याशागर सिंग याने 23व्या मिनिटास ट्राऊ संघास आघाडी मिळवून दिली, नंतर गोकुळम केरळासाठी शरीफ महंमद (69वे मिनिट), एमिल बेनी (74वे मिनिट), डेनिस अँटवी (77वे मिनिट), बदली खेळाडू मुहंमद रशीद (90+8 मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवून गोकुळम केरळाचे विजेतेपद साकारले. 90+3 मिनिटास सामन्यातील दुसरे यलो कार्ड मिळाल्यामुळे गोकुळम केरळाच्या व्हिन्सी बार्रेटो याला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले.

चर्चिल ब्रदर्स संघ कमनशिबी

पंजाब एफसीविरुद्ध सामन्याच्या आठव्या मिनिटास स्लोव्हेनियन लुका मॅसेन याने पेनल्टी फटक्यावर चर्चिल ब्रदर्सला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर होंडुरासच्या क्लेव्हिन झुनिगा याने दोन गोल केले. त्याने अनुक्रमे 25 व 45+3 मिनिटास गोल केल्यामुळे विश्रांतीला चर्चिल ब्रदर्स संघ 3-0 फरकाने आघाडीवर होता. उत्तरार्धात जोसेबा बैटिया याने 65व्या, तर पापा बाबाकार दियावारा याने 69व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केल्यामुळे पंजाब एफसीला पिछाडी दोन गोलने कमी करता आली. चर्चिल ब्रदर्सचा हा 15 लढतीतील नववा विजय ठरला. पंजाब एफसीला पाचवा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे 15 लढतीनंतर ते 22 गुणांसह चौथ्या स्थानी राहिले.

दृष्टिक्षेपात...

- टिड्डिम रोड अॅथलेटिक युनियनच्या बिद्याशागर सिंगचे स्पर्धेत सर्वाधिक 12 गोल

- गोकुळम केरळाचा डेनिस अँटवी आणि चर्चिल ब्रदर्सचा लुका मॅसेन यांचे प्रत्येकी 11 गोल

- चर्चिल ब्रदर्सचा क्लेव्हिन झुनिगा याचे 8 गोल

- स्पर्धेत एकूण २१६ गोल

- गोकुळम केरळाचे सर्वाधिक ३१ गोल
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com