Goa Professional League: सेझा अकादमीसाठी मिनेशचा गोल मौल्यवान

दैनिक गोमंतक
गुरुवार, 15 एप्रिल 2021

सेझा अकादमीने सामन्याच्या 19व्या मिनिटास घेतलेली आघाडी निर्णायक ठरली.

पणजी: मिनेश कुंकळकर याने नोंदविलेल्या गोलच्या बळावर गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी सेझा फुटबॉल अकादमीने पणजी फुटबॉलर्सला 1-0 फरकाने निसटते हरविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सेझा अकादमीने सामन्याच्या 19व्या मिनिटास घेतलेली आघाडी निर्णायक ठरली. हा गोल सेटपिसेसवर झाला. समीर कश्यपच्या फ्रीकिकवर मायरन परेराने हेडिंग साधले, यावेळी पणजी फुटबॉलर्सचा गोलरक्षक प्रेस्टन रेगो चेंडू व्यवस्थित अडवू शकला नाही. त्याचा लाभ उठवत मिनेशने चेंडूला नेटची अचूक दिशा दाखविली. 

पिछाडीनंतर पणजी फुटबॉलर्सने बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले, पण ते सेझा अकादमीच्या गोलरक्षक रोनाल गांवकार याला चकवू शकले नाहीत. पणजीच्या जॉयसन गांवकार याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. विश्रांतीपूर्वी पांडुरंग गावसच्या असिस्टवर लॉईड कार्दोझ याला अचूक फटका मारता आला नाही, त्यामुळे पणजी फुटबॉलर्सची आणखी एक संधी हुकली. (Goa Professional League Mineshs goal valuable for Seza Academy)

Goa Professional League: इंज्युरी टाईम गोलमुळे वास्को विजयी

सामन्याच्या 66व्या मिनिटास कुणाल साळगावकरचा सणसणीत फटका पणजीचा गोलरक्षक प्रेस्टन रेगो याने अडविल्यामुळे सेझा अकादमीची आघाडी वाढू शकली नाही. उत्तरार्धातील अखेरच्या सत्रात बदली खेळाडू आकाश सनदी याचा प्रयत्न गोलरक्षक रोनालने वेळीच रोखल्यामुळे पणजी फुटबॉलर्सला बरोबरी साधता आली नाही. सामना संपण्यास एक मिनिट बाकी असताना फहीझ महंमद याचा फटका थेट गोलरक्षकाच्या हाती गेल्यामुळे सेझा अकादमीची आघाडी एका गोलपुरती मर्यादित राहिली. 

 

संबंधित बातम्या