Goa Professional League: शिरवडे क्लब महिला फुटबॉलमध्ये चँपियन

Goa Professional League: शिरवडे क्लब महिला फुटबॉलमध्ये चँपियन
Goa Professional League Shirwade Club Champion in Womens Football

पणजी : गोवा फुटबॉल असोसिएशनच्या चौथ्या महिला लीग फुटबॉल स्पर्धेत शिरवडे स्पोर्टस क्लब विजेता ठरला. पाच संघांच्या या साखळी फेरीत एफसी गोवा संघाला उपविजेतेपद, तर एफसी वायएफए संघाला तिसरा क्रमांक मिळाला. 

शिरवडे क्लबने स्पर्धेत अपराजित राहताना सात विजय व एका बरोबरीसह सर्वाधिक 22 गुणांची कमाई केली. शेवटच्या लढतीत बुधवारी त्यांनी कॉम्पेशन एफसीवर आठ गोलने मात केली. उपविजेत्या एफसी गोवाने 19 गुण नोंदविले. त्यांनी स्पर्धेत सहा विजय, एक बरोबरी व एक पराभव अशी कामगिरी केली. शेवटच्या साखळी लढतीत बुधवारी त्यांनी गोवा युनायटेड स्पोर्टस अकादमीचा पाच गोलने पराभव केला. (Goa Professional League Shirwade Club Champion in Womens Football)

स्पर्धेचे बक्षीस वितरण बुधवारी संध्याकाळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आमदार चर्चिल आलेमाव, म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा, स्पर्धेचे पुरस्कर्ते वेदांता स्पोर्टसचे अध्यक्ष अनन्य अगरवाल, वेदांता लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौविक मजुमदार, जीसीए पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झाले. कोविड-१९ आरोग्यसुरक्षा मार्गदर्शक शिष्टाचाराच्या अंमलबजावणीसह कार्यक्रम झाला.

महिला फुटबॉलसाठी व्यासपीठ : मुख्यमंत्री

राज्यातील महिला फुटबॉलसाठी व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोवा फुटबॉल असोसिएशन व वेदांताचे अभिनंदन केले. राज्यातील महिला फुटबॉलपटूंनी संधीचा लाभ उठवत फुटबॉलमध्ये मोठी उंची गाठण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. जीएफएचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांनी वेदांताचे राज्यातील महिला फुटबॉलसाठी पाठबळ मौलिक असल्याचे नमूद करून राज्यातील खाणव्यवसाय पूर्ववत सुरू झाल्यानंतर धुळेर येथील स्टेडियमवर नव्याने कृत्रिम टर्फ टाकण्यासाठी वेदांताने जीएफएला मदत करावी असे आवाहन यावेळी केले. गोवा फुटबॉल संघटनेस 50 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आलेमाव यांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आभार मानले, तसेच बाकी 50 लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली. 

शिरवडे राष्ट्रीय स्पर्धेस पात्र

गोवा महिला लीग फुटबॉल स्पर्धा जिंकल्यामुळे शिरवडे स्पोर्टस क्लब आगामी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या राष्ट्रीय पातळीवरील महिला लीग फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत शिरवडे क्लब गोव्याचे प्रतिनिधित्व करेल.

महिला लीगमधील वैयक्तिक विजेते

- गोल्डन बूट ः स्टेसी कार्दोझ (एफसी गोवा)

-  गोल्डन  ग्लोव्ह ः रिमा गडेकर (शिरवडे क्लब)

- गोल्डन बॉल ः एनेट दा कॉस्ता (एफसी वायएफए)

- उदयोन्मुख खेळाडू ः व्हिनोष्का (शिरवडे)
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com