Goa Professional League: स्पोर्टिंग क्लबचा पंचतारांकित विजय

Goa Professional League Sporting Clubs five star victory
Goa Professional League Sporting Clubs five star victory

पणजी : स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने शनिवारी गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत अव्वल स्थानी झेप घेताना पंचतारांकित विजय नोंदविला. त्यांनी पणजी फुटबॉलर्सचा 5-0 फरकाने धुव्वा उडविला.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सामना झाला. स्पोर्टिंगला पूर्ण तीन गुण मिळवून देताना अकेराज मार्टिन्स याने दोन गोल केले. त्याने पाच मिनिटांत दोन वेळा अचूक नेमबाजी करताना अनुक्रमे 40 व 45व्या मिनिटास चेंडूला नेटची दिशा दाखविली. याशिवाय रोहित तोताड याने 19व्या, फिलिप ओदोग्वू याने 50व्या, तर गौरव काणकोणकर याने 68व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल नोंदविला. पूर्वार्धात स्पोर्टिंग क्लब 3-0 फरकाने आघाडीवर होता. 

स्पोर्टिंग क्लबचा हा नऊ लढतीतील पाचवा विजय ठरला. त्यांचे आता सर्वाधिक 19 गुण झाले आहेत. त्यांनी साळगावकर एफसी व धेंपो स्पोर्टस क्लबवर दोन गुणांची आघाडी मिळविली आहे. पणजी फुटबॉलर्सला पाचवा पराभव पत्करावा लागला, त्यामुळे नऊ लढतीनंतर त्यांचे 10 गुण कायम राहिले. (Goa Professional League Sporting Clubs five star victory)

मायरन फर्नांडिसच्या पासवर मार्कुस मस्कारेन्हास याने चेंडूवर ताबा राखत गोलक्षेत्रात रोहितला गोल करण्याची सुरेख संधी प्राप्त करून दिली, जी युवा खेळाडू सहजपणे साधली. विश्रांतीला पाच मिनिटे असताना मायरन याच्याकडून मिळालेल्या पासवर गौतम याने अकेराज मार्टिन्सला चेंडू दिल्यानंतर त्याने मोसमातील वैयक्तिक पहिला गोल केला. त्यानंतर गौरव काणकोणकर याच्या सणसणीत फ्रीकिकवर पणजी फुटबॉलर्सचा गोलरक्षक शेर्विन दा कुन्हा याने फटका रोखल्यानंतर अकेराजने आणखी एक गोल केला. यावेळी त्याने मार्कुसच्या असिस्टवर गोलरक्षक शेर्विन याला अजिबात संधी दिली नाही. 

विश्रांतीनंतरच्या पाचव्या मिनिटास नायजेरियन फिलिप ओदोग्वू याने मायरन फर्नांडिसच्या क्रॉसपासवर चेंडूला अचूक दिशा दाखविली. त्यानंतर सेटपिसेसवर स्पोर्टिंगच्या खाती पाचव्या गोलची नोंद झाली. मायरनच्या कॉर्नर किकवर मार्कुसने अप्रतिम हेेडिंग साधले, पण चेंडूला पणजी फुटबॉलर्सच्या बचावपटूने रोखले, यावेळी गौरवने चेंडूवर ताबा राखत संघाच्या खाती पाचव्या गोलची भर टाकली. 
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com