Goa Professional League: पेनल्टी फटका दवडल्याने स्पोर्टिंगचे नुकसान

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 25 मार्च 2021

फटका अडविणारा एफसी गोवाचा कर्णधार-गोलरक्षक डायलन डिसिल्वा उल्लेखनीय ठरला.

पणजी : गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी स्पोर्टिंग क्लब द गोवा आणि एफसी गोवा यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. निर्धारित 90 मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करता आला नाही, मात्र संधी गमावण्यात आल्या. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये पेनल्टी फटका दवडल्यामुळे स्पोर्टिंगला विजयाच्या पूर्ण तीन गुणांना मुकावे लागले. फटका अडविणारा एफसी गोवाचा कर्णधार-गोलरक्षक डायलन डिसिल्वा उल्लेखनीय ठरला.

स्पोर्टिंग क्लब, तसेच एफसी गोवास प्रत्येकी एक गुण मिळाला. स्पोर्टिंगची ही तिसरी, तर एफसी गोवाची दुसरी बरोबरी ठरली. स्पोर्टिंगचे आता सात लढतीतून १५ गुण, तर एफसी गोवाचे आठ लढतीतून १४ गुण झाले आहेत. (Goa Professional League Sporting losses due to penalty shootout)

सामन्याच्या 15व्या मिनिटास स्पोर्टिगने संधी गमावली. मायरन फर्नांडिसच्या असिस्टवर दत्तराज गावकर चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही. अर्ध्या तासाच्या खेळानंतर स्पोर्टिंगने गोल केला होता, पण रेफरीने अवैध ठरविला. रोहित तोताड याच्या पासवर नायजेरियन फिलिप ओदोग्वू याने एफसी गोवाच्या खेळाडूस धक्का दिला होता.

Goa Professional League : यूथ क्लब मनोराची विजयी चमक; वेळसाव क्लबवर एका गोलने..

विश्रांतीस तीन मिनिटे बाकी असताना एफसी गोवास गोल करण्याची संधी होती, परंतु सेरिनियो फर्नांडिसच्या फटक्यात दम नव्हता. विश्रांतीनंतर एफसी गोवाच्या डेल्टन कुलासोने मैदानाच्या डाव्या बाजूतून मुसंडी मारली होती, मात्र सेरिनियो फर्नांडिस फटका स्पोर्टिंगच्या खेळाडूने वेळीच रोखला. 74व्या मिनिटास स्पोर्टिंगच्या मार्कुस मस्कारेन्हास याचा हेडर गोलपट्टीवरून गेल्याने गोलशून्य बरोबरीची कोंडी पुन्हा कायम राहिली. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये एफसी गोवाच्या लेस्ली रिबेलो याने गोलक्षेत्रात स्पोर्टिंगच्या मार्कुस मस्कारेन्हास याला पाडले, यावेळी रेफरीने पेनल्टी फटक्याची खूण केली, मात्र क्लाईव्ह मिरांडा याचा फटका एफसी गोवाचा गोलरक्षक डायलन डिसिल्वा अचूक अंदाज बांधत अडविला, त्यानंतर रिबाऊंडवरही क्लाईव्ह चेंडूला नेटची दिशा दाखवू शकला नाही.
 

संबंधित बातम्या