गोव्याचा रणजी संघ ऑफस्पिनरविना!

क्रीडा प्रतिनिधी
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाला मागील दोन मोसमापासून दर्जेदार ऑफस्पिन गोलंदाजाची तीव्रतेने अनुपस्थिती जाणवत आहे. राज्यातील सध्याच्या फिरकी गोलंदाजांचा विचार करता, उणीव लवकर भरून निघण्याची शक्यता कमीच आहे.

पणजी: गोव्याच्या रणजी क्रिकेट संघाला मागील दोन मोसमापासून दर्जेदार ऑफस्पिन गोलंदाजाची तीव्रतेने अनुपस्थिती जाणवत आहे. राज्यातील सध्याच्या फिरकी गोलंदाजांचा विचार करता, उणीव लवकर भरून निघण्याची शक्यता कमीच आहे.

गोव्याच्या रणजी करंडक मोहिमेत २०१८-१९ व २०१९-२० मोसमात संघात एकही ऑफस्पिनर नव्हता. फिरकीचा सारा भार डावखुऱ्या आणि लेगस्पिन फिरकीपटूंनी उचलला. अमित यादवने फॉर्म गमावल्यानंतर गोव्याला हमखास बळी घेणारा ऑफस्पिनर गवसलाच नाही. अमितने गोव्यातर्फे ३७ रणजी क्रिकेट सामन्यात १२३ गडी बाद केले, पण कारकिर्दीच्या अखेरच्या तीन मोसमात त्याला ११ सामन्यांतून ३८ गडीच बाद करता आले. वयोगट स्पर्धांत आश्वासक ठरलेला ऑफस्पिन गोलंदाज वेदांत नाईक सीनियर पातळीवर विशेष प्रभाव पाडू शकला नाही.

गोव्याच्या रणजी संघाला ऑफस्पिनरची खरोखरच गरज आहे. पाहुणा (व्यावसायिक) क्रिकेटपटू करारबद्ध करताना या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे. उपयुक्त फलंदाजी करणारा ऑफस्पिन गोलंदाज असल्यास खूपच चांगले होईल, त्यामुळे संघाचा समतोलही साधला जाईल. मागील दोन मोसमात फलंदाज आणि लेगस्पिनर ही दुहेरी जबाबदारी अमित वर्मा पेलत आहे. तसाच अष्टपैलू हवा आहे, असे गोव्याच्या एका माजी प्रशिक्षकाने सांगितले. अमोघ देसाईच्या तंदुरुस्तीमुळे पार्टटाईम ऑफस्पिनर उपलब्ध असेल, पण तो अधूनमधून मध्यमगती गोलंदाजीही टाकतो, तसेच तो मुख्य फलंदाज आहे, त्यामुळे ऑफस्पिनर या नात्याने त्याच्या पूर्णपणे अवलंबून राहता येणार नाही, असे माजी प्रशिक्षकाने नमूद केले.

ऑफस्पिनर नसताना...
मागील दोन मोसमात लेगस्पिनर अमित वर्मा, तसेच डावखुरे फिरकीपटू दर्शन मिसाळ व अमूल्य पांड्रेकर यांनी गोव्याच्या फिरकी गोलंदाजीचा भार वाहिला. या त्रिकुटाने गतमोसमात एकत्रितपणे ९२ विकेट्स प्राप्त केल्या. २०१७-१८ मोसमात गोव्याच्या रणजी संघात शेवटच्या वेळेस ऑफस्पिन गोलंदाज दिसला होता. त्या मोसमात अमित यादव दोन, तर वेदांत नाईक एक सामना खेळला. याशिवाय ऑफस्पिन गोलंदाजीत श्रीनिवास फडतेचा पर्यायही तपासून पाहण्यात आला.

संबंधित बातम्या