दशकभरात रणजी करंडक स्पर्धेत गोव्यातील पाहुण्या क्रिकेटपटूंत मोजकेच अपवाद

गोवा रणजी करंडक स्पर्धेत पाहुण्या क्रिकेटपटूत मोजकेच अपवाद
गोवा रणजी करंडक स्पर्धेत पाहुण्या क्रिकेटपटूत मोजकेच अपवाद

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत दशकभरातील कालावधीत अवघे मोजकेच अपवाद वगळता गोव्याकडून खेळलेले पाहुणे (व्यावसायिक) क्रिकेटपटू परिणामकारक ठरले नाहीत. २०१०-११ ते २०१९-२० या कालावधीत १४ पाहुण्यांनी गोव्याचे प्रतिनिधित्व केले.

गतमोसमात गोव्याकडून खेळलेला गुजरातचा यष्टिरक्षक स्मित पटेल यंदा नसेल. दिल्लीचा आदित्य कौशिक आता गोव्यासाठी स्थानिक खेळाडू बनणार आहे. त्यामुळे सध्या फक्त अमित वर्मा या पाहुण्या खेळाडूचाच करार कायम आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत दाखला (एनओसी) घेत बी. संदीप गोव्याकडून खेळण्यास राजी असला, तरी त्याच्याशी अजून अधिकृत करार झालेला नाही.

गोव्याच्या रणजी क्रिकेट संघात २०१४-१५ मोसमात एकही पाहुणा क्रिकेटपटू नव्हता, हा एकमेव अपवाद आहे. २०१८-१९ मोसमात भारताचा माजी कर्णधार महंमद अझहरुद्दीन यांचा मुलगा महंमद असादुद्दीन याला दोन रणजी सामन्यांत खेळविले, हा निर्णय गोवा क्रिकेट असोसिएशनसाठी चुकीचा ठरला. असादुद्दीनने थेट गोव्याकडून पदार्पण केले, फलंदाजीत तो वडिलांचा वारसा अजिबात राखू शकला नाही.

गोव्यातर्फे चार मोसम खेळताना १३६३ धावा केलेला माजी कसोटीपटू अजय रात्रा २०१०-११ मोसमात शेवटचा खेळला. उत्तर प्रदेशचा रविकांत शुक्ला (२०१२-१३ व २०१३-१४) असे दोन मोसम खेळला, पण त्याची उपयुक्तता जाणवली नाही. तमिळनाडूचा विद्युत शिवरामकृष्णन (२०१०-११), महाराष्ट्राचा अभिषेक राऊत (२०११-१२), तमिळनाडूचा वसंत सर्वानन (२०११-१२), हरियानाचा मनविंदर बिस्ला (२०१२-१३) यांची उपस्थिती फक्त एका मोसमापुरतीच ठरली. २०१५-१६ मोसमात गोव्याकडून महाराष्ट्राचा धीरज जाधव, राजस्थानचा ऋतुराज सिंग व केरळचा प्रशांत परमेश्वरन असे तीन पाहुणे क्रिकेटपटू रणजी स्पर्धेत खेळले. त्यापैकी फक्त ऋतुराजच आणखी दोन मोसम संघात कायम राहिला. त्याने तीन मोसमात ६२ गडी बाद करून छाप पाडली, पण अखेरच्या मोसमात (२०१७-१८) दुखापतीमुळे त्याची मोहीम अर्धवट राहिली.

अमितची अष्टपैलू चुणूक
अमित वर्मा, महंमद असादुद्दीन व आसामचा कृष्णा दास यांनी २०१८-१९ मोसमात गोव्याचे प्रतिनिधित्व केले. असादुद्दीनची खराब कामगिरीमुळे मोसम संपण्यापूर्वीच हैदराबादला घरवापसी झाली. एका मोसमानंतर कृष्णा याने पुन्हा आसामला परतण्याचा निर्णय घेतला, तर अमितने २०१९-२० मोसमातील रणजी स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व करताना अष्टपैलू चुणूक दाखविली. या शैलीदार फलंदाजाने दोन मोसमातील १९ सामन्यांत ६ शतकांसह १३९७ धावा केल्या, तसेच लेगस्पिनच्या बळावर ५६ गडी बाद केले, त्यापैकी ४३ बळी २०१९-२० मोसमात मिळविले. यष्टिरक्षक स्मित पटेल २०१९-२० मोसमात ऐनवेळी गोव्यात दाखल झाला. प्लेट गटातील मोहिमेत त्याने ३ शतकांसह ७९९ धावा केल्या. गतमोसमात आदित्य कौशिकने गोव्याकडून रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण झटपट क्रिकेटमध्ये लक्षवेधक ठरलेला हा सलामीवीर रणजी स्पर्धेत अपयशी ठरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com