
पणजी: गोव्याच्या सीनियर पुरुष कबड्डी संघाने शनिवारी ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. हरियाणातील चरखी दादरा येथे सुरू असलेल्या ६९व्या राष्ट्रीय सीनियर पुरुष कबड्डीत गोव्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली आणि त्याचबरोबर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठीही पात्रता मिळविली.
दरम्यान, गोव्याच्या पुरुष संघाने शनिवारी उपउपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य कर्नाटकला १३ गुणांनी हरविले. गोव्याच्या संघाने लढत ४०-२७ गुण फरकाने जिंकली. पुढील फेरीत त्यांच्यासमोर उत्तर प्रदेशचे आव्हान असेल. उत्तर प्रदेशने उपउपांत्यपूर्व लढतीत दिल्लीला ४१-१६ असे २५ गुण फरकाने हरविले. कर्नाटकविरुद्ध (Karnataka) गोव्याने (Goa) सर्वाधिक २५ गुण चढाईत मिळविले. याशिवाय नऊ टॅकल गुणही प्राप्त केले. ऑल-आऊटमध्ये चार, तर अवांतरमध्ये गोव्याला दोन गुण मिळाले.
तसेच, प्रो-कबड्डी लीगमध्ये यूपी योद्धा संघाचे जसवीर सिंग गोव्याचे प्रशिक्षक आहेत. राष्ट्रीय स्पर्धेपूर्वी गोव्याने मेरठ येथे जसवीर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला होता. ‘‘गोव्याच्या पुरुष संघाने प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. साहजिकच ही सीनियर गटात ऐतिहासिक कामगिरी ठरते. यापूर्वी गोव्याने दोन वेळा ज्युनियर वयोगटात उपांत्य फेरी गाठली होती,’’ अशी माहिती गोवा कबड्डीचे आश्रयदाते दत्ताराम कामत यांनी दिली.
साखळी फेरीत विजयी हॅटट्रिक
उपउपांत्यपूर्व लढतीत कर्नाटकला पराभूत करण्यापूर्वी गोव्याने क गट साखळी फेरीत अनुक्रमे विदर्भ (४८-२९), मणिपूर (Manipur) (४०-१०), राजस्थान (५१-३०) या संघांना पराजित केले होते.
वर्षभरात कबड्डीत प्रगती
यावर्षी मार्चमध्ये झालेल्या सीनियर राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत गोव्याच्या महिलांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती. आता पुरुष संघाने एक पाऊल पुढे टाकत आगामी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी जागा निश्चित केली.
‘‘सीनियर पुरुष गटात गोव्याची (Goa) ही सर्वोत्तम आणि ऐतिहासिक कामगिरी आहे. उपांत्यपूर्व फेरीसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता मिळविलेल्या संघाचे, प्रशिक्षकांसह सर्वांचे अभिनंदन.’’
- रुक्मिणी कामत, अध्यक्ष-गोवा कबड्डी संघटना
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.